मुंबई : केंद्र सरकारने भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याच्या दृष्टीने 'वंदे भारत' ही एक्स्प्रेस सुरू केली आहे. अतिशय वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी भारतीय बनावटीची ही 'वंदे भारत' ही एक्स्प्रेस आहे. 'वंदे भारत'ची संख्या वाढवण्याकडे रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गांवरून वंदे भारत सुरू करण्यासाठीची चाचपणी सुरू असताना दुसरीकडे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी अपडेट दिली आहे. मुंबईतील एका मार्गावरून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून बुलेट ट्रेन विकसित केली जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या E5 मालिकेतील शिंकानसेन मॉडेल (E-10 म्हणून ओळखले जाते) ही ट्रेन वापरली जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जपानमधून एक तज्ज्ञांचे एक पथक आले होते. त्यांनी बुलेट ट्रेन मार्गाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
या मार्गावर धावणार नाही वंदे भारत...
केंद्र सरकारसाठी महत्त्वकांक्षी असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ही एका मार्गावर धावणार नाही. 508 किलोमीटरच्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात माध्यमांशी बोलताना वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत आणि बुलेट ट्रेनसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान पूर्णपणे वेगळे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सप्टेंबर 2024 मध्ये, रेल्वे मंत्रालयाने BEML ला भारतातील पहिली 250 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी वंदे भारत ट्रेन डिझाइन आणि बांधण्याचे काम सोपवले. अनेक तज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर या ट्रेनसाठी योग्य असेल. हा कॉरिडॉर भारतातील एकमेव हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावरून धावणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.