मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या 11 जागांसाठी एकुण 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे निवडणुकीत चूरस वाढली आहे. या निवडणुकीत कुणाचा उमेदवार पडणार त्यासाठी कुणाचं राजकारण सरस ठरणार? याची रणनिती आतापासूनच ठरू लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राज्यात सत्तांतर घडून आलं होतं. आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे रंगत वाढली आहे. विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
advertisement
भाजपचे उमेदवार
1) पंकजा मुंडे
2) योगेश टिळेकर
3) डॅाक्टर परीणय फुके
4) अमित गोरखे
5) सदाभाऊ खोत
शिवसेना उमेदवार
1) भावना गवळी
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
1) राजेश विटेकर
2) शिवाजी गर्जे
काँग्रेस
1) प्रज्ञा सातव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
1) मिलिंद नार्वेकर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
1) जयंत पाटील, शेकाप ( पाठिंबा )
विधान परिषदेच्या या निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांचा कोटा निर्धारीत करण्यात आला आहे. विधान सभेच्या 288 आमदारांपैकी 278 आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधान सभा पक्षीय बलाबल
भाजप 103+7 (अपक्षांचा पाठिंबा) =110
शिवसेना 38+10 (अपक्षांचा पाठिंबा) =48
राष्ट्रवादी अजित पवार 40+3 (अपक्षांचा पाठिंबा) =43
महायुती 204
काँग्रेस 42
राष्ट्रवादी शरद पवार 12
शिवेसना उद्धव ठाकरे 15 +1= 16
महाविकास आघाडी 70
विधान परीषद निवडणुकीत कोणाताही दगाफटका नको म्हणून सर्वच पक्ष हॉटेल पॅालिटिक्समध्ये व्यस्त झालेले आहेत. आमदार फूटू नयेत तसंच त्यांना मतदान कसं करायचं, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कुणाला द्यायची याचंही प्रशिक्षण सर्व आमदारांना हॅाटेलमध्ये दिले जाणार आहे.
कुणाचे आमदार कुठल्या हॉटेलमध्ये?
1) भाजप- ताज प्रेसिडेंन्सी कफ परेड
2) शिवसेना- ताज लॅंड्स वांद्रे
3) राष्ट्रवादी काँग्रेस- द ललीत एअरपोर्ट
4) शिवसेना ठाकरे गट- ITC ग्रॅंड मराठा परळ
विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी फिल्डिंग लावली आहे. विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आमदारांची संख्या अपुरी आहे. ती पूर्ण करण्यासाठी साहजिकच इतर पक्षांच्या आमदारांच्या मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यामुळे मतांच्या साठमारीत कोण बाजी मारणार? आणि कोणाची विकेट पडणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.
