नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी नायगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज किलजे नायगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी चिंचोटी परिसरातील दुर्गामाता मंदिराजवळून जात असताना त्यांना 'रूहान हेअर कटिंग सलून'मधून देशविरोधी अर्थ असणारं गाणं ऐकू आलं. पोलिसांनी तत्काळ दुकानात छापा टाकला. यावेळी तिथं अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह (वय २५) हा तरुण मोबाईलवर युट्युबच्या माध्यमातून हे वादग्रस्त गाणं मोठ्या आवाजात वाजवत असल्याचं निष्पन्न झालं.
advertisement
आरोपी उत्तर प्रदेशचा रहिवासी
अटक करण्यात आलेला आरोपी अब्दुल रहमान हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील लालगंज येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्यात हेच प्रक्षोभक गाणे सुरू असल्याचं आढळलं. भारताच्या सार्वभौमत्वाच्या आणि एकतेच्या विरोधात माहिती पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९७(१)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मंत्री नितेश राणेंकडून इशारा
या घटनेचा व्हिडीओ समोर येताच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावरून तीव्र शब्दात इशारा दिला आहे. "मुंबईत राहून 'काश्मीर बनेगा पाकिस्तान'चे नारे चालणार नाहीत. यांची सगळी मस्ती आमचे 'देवा भाऊ'चे (देवेंद्र फडणवीस) बुलडोझर उतरवतील! जय श्री राम," अशी पोस्ट करत राणे यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईजवळ असणाऱ्या नायगावमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याने आता याला राजकीय वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे. सध्या या परिसरात शांतता आहे.
