कारंजा नगर परिषदच्या ३१ नगर सेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत एमआयएमला १६ जागा, भाजपला १३ जागा, काँग्रेसला एक जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा मिळाली. फरीदा पुंजानी या ३५ वर्षांआधी नगरसेविका होत्या. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर त्यांनी पुन्हा नगर परिषदेत पुनरागमन केले.
एमआयएमची पतंग उंचच उंच, भाजपला धक्का
एमआयएमचे नेतृत्व करणाऱ्या फरीदा बानो पुंजानी आणि त्यांच्या पतीचा कारंजा शहरावर प्रभाव आहे. शहरात त्यांना मानणारा मोठा मतदार आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे बहुतांश हिंदू मतदार त्यांच्या पाठीशी कायम उभे राहतात. जातपात, पक्ष न पाहता पुंजानी यांना मतदार नेहमी ताकद देतात. यंदा एमआयएमकडून पुंजानी निवडणुकीच्या रिंगण्यात होत्या. स्थानिक प्रश्नांवर भर देऊन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. माजी खासदार इम्तियाज जलील आणि ओवेसी यांचे दूत म्हणून हैदराबादहून आलेल्या विशेष प्रतिनिधींची प्रचारकामी पुंजानी यांना साथ मिळाली.
advertisement
दुसरीकडे एमआयएमच्या विजयाने भाजप आमदार सई डहाके यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. भाजपमधील अंतर्गत वाद आणि गटातटाच्या राजकारणाचा पक्षाला फटका बसला. परिणामी कारंजा नगर परिषदेवर सत्ता मिळविण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. कारंजामधील भाजपचे जुने जाणते नेते, तीनदा नगराध्यक्ष राहिलेल्या नरेंद्र गोलेच्छा यांच्या सुनबाई निशा रुणवाल गोलेच्छा या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.
एमआयएम फॅक्टर का चालला?
पुंजानी कुटुंबाची स्थानिक राजकारणावर चांगली पकड आहे. पुंजानी आधी राष्ट्रवादी, नंतर वंचित, नंतर बसपा पक्षात होते. पक्षांतर करूनही मतदार त्यांना आशीर्वाद देतात, हे विशेष. फरीदा यांचे सुपुत्र युसूफ पुंजानी यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे क्रमांक दोनची मते त्यांनी दोन्ही वेळा घेतली. विधानसभेची पायरी चढता चढता ते राहिले. स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याचा आणि मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. एमआयएमला निवडून देण्यात हिंदूंचाही वाटा मोठा आहे. फरीदा यांचे पती शफी आणि मुलगा युसूफ यांना मानणारा मोठा वर्ग कारंज्यात आहे. वेगवेगळ्या जात समूहाचे लोक, व्यक्ती आणि नेतृत्व म्हणून त्यांना पसंती देतात.
विदर्भात एमआयएमची एन्ट्री
आतापर्यंत मुंबईतील काही भागांत, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, धुळे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एमआयएमच्या उमेदवारांना यश मिळायचे. परंतु वाशिम नगर परिषदेत २ आणि कारंज्यात संपूर्ण नगर परिषद जिंकून एमआयएमने विदर्भात झोकात एन्ट्री केली.
