नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजेच्या सुमारास लाखाळा परिसरात प्रचाराच्या कारणावरून किंवा अन्य काही मुद्द्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवार समोरासमोर आले. यावेळी भाजपचे उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखडे यांनी शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण इढोळे यांना मारहाण केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर वानखडे यांनी इढोळे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
advertisement
या घटनेनंतर प्रवीण इढोळे यांनी तातडीने वाशिम शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. इढोळे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भाजप उमेदवार सतीश वानखडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच सतीश वानखडे फरार झाला असून, पोलीस सध्या त्यांचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे लाखाळा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांचे आवाहन
या घटनेवर बोलताना वाशिम शहराचे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर म्हणाले की, "निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या दहशतीला किंवा आमिषाला बळी पडू नये. सर्वांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. जर कोणी मतदारांना धमकावण्याचा किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा."
राजकीय वातावरण तापले
मतदानाच्या आदल्या रात्रीच उमेदवाराला अशाप्रकारे मारहाण झाल्याने वाशिममधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.
