नैसर्गिक उल्कापातामुळे निर्माण झालेलं आशिया खंडातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर असलेल्या लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी 02.69 मीटरने वाढली आहे. त्यामुळे लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन मंदिर आणि जैव विविधतेला धोका निर्माण झाला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षात अचानक सातत्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने लोणार सरोवराचे अभ्यासकही चिंतेत आहेत.
advertisement
लोणार सरोवराच्या जल पातळीत 02.69 मीटरने वाढ झाली असून त्याबाबत आता संशोधक अभ्यास करत आहेत. पाणी पातळीमध्ये वाढ का आणि कशामुळे होत आहे? यावर आता संशोधन सुरू होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार बेसॉल्ट खडकापासून बनलेलं हे जगातलं एकमेव खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. उल्कापातातून याचा जन्म झाला. या खाऱ्या पाण्याचं सरोवर परिसरात असलेल्या मातीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. चंद्रावरील मातीचं खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचं नातं आहे, असं जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे संशोधक नेहमी येतात.
