अभ्यासकांच्या मते. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे सुमारे 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले हे जगातील एकमेव सरोवर आहे. सरोवरातील पाणी अल्कधर्मीय असून पाण्यात सोडियम क्लोराईड आणि सल्फेटसारख्या क्षारांचे प्रमाण अधिक आहे. दुर्मिळ सूक्ष्म जिवाणूंसाठी हे पाणी अतिशय पोषक आहे. मात्र, आता या पाण्याची 'पीएच' पातळीदेखील कमी झाल्यामुळे पाण्याचे गुणधर्म बदलत आहेत.
advertisement
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे परिसरातील कमळजा माता मंदिर, गणेश मंदिर, रामगया मंदिर अशी अनेक ऐतिहासिक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. सरोवराच्या काठावर पाण्याचे पाच जिवंत झरे आहेत. हे पाणी आधी शेतीसाठी दिलं जात होतं. त्यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी स्थिर होती. काळाच्या ओघात येथील शेतीक्षेत्र नाहीसं झालं असून विहिरीदेखील बुजल्या आहेत.
परिसरात असलेल्या झऱ्यांचं पाणी थेट सरोवरात जात आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तर झऱ्यांचं पाणी देखील वाढलं आहे. परिणामी सरोवराच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदाच माशांचं अस्तित्व आढळलं आहे.
अभ्यासकांच्या मते, लोणारची ही अवस्था मानवी हस्तक्षेपामुळे झाली आहे. लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरात जात आहे. शिवाय, पर्यटकांनासाठी सरोवराच्या काठावर रस्ता बांधला जात आहे. या कामातील माती आणि मुरुम थेट सरोवराच्या तळाशी जात आहे. त्यामुळे देखील सरोवराची खोली कमी झाली आहे.