'सेवा हमी कायदा 2015'च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आता नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सेवांसंबंधित माहिती ही व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 9967200925 हा क्रमांक जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
advertisement
सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांना सेवा सुलभरित्या देता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने 9967200925 हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला असून त्याद्वारे व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे नागरिकांना सेवा देण्यात येणार आहे. या सेवांमध्ये महा ई सेवा केंद्रांचे ठिकाण, वेळा, थेट अर्ज करण्याची लिंक, सर्व सेवांची माहिती, विविध महसूल सेवांसाठी लागणारी कागदपत्रांची यादी, तक्रार दाखल करण्याचे ठिकाण, सेवांसाठी कुठे अर्ज करावा याबाबतची माहिती तसेच घरपोच सेवा हवी असल्यास त्याबाबत विनंती करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मार्गदर्शनाखाली हे चॅट बॉट विकसित केले असून ते पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित आहे.