पेशव्यांच्या दरबारात मंत्रपठणाच्या अद्वितीय शैलीमुळे ‘पाठक’ या आडनावाला ‘फुलंब्रीकर’ अशी नवीन ओळख मिळाली. 20 जानेवारी 1898 रोजी आळंदी येथे जन्मलेले कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर, बालपणापासूनच संगीत आणि रंगभूमीकडे ओढले गेले. 1934 मध्ये प्रभात स्टुडिओत त्यांनी ‘वंदे मातरम्’ला संगीतबद्ध करण्याचे प्रयोग सुरू केले. झिंझोटी रागात मंद्र आणि मध्य सप्तकात त्यांनी अशी चाल निर्माण केली की ती स्त्री-पुरुष, तरुण-ज्येष्ठ अशा सर्वांना सहज गाता यावी. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये, स्वतंत्र भारताचे प्रतिक म्हणून त्यांच्याच स्वरातील ‘वंदे मातरम्’ प्रथम ध्वनिमुद्रित स्वरूपात वाजले.
advertisement
स्वातंत्र्यवीर सावरकर, सरोजिनी नायडू, सरदार पटेल अशा राष्ट्रीय नेत्यांनी त्यांचा सन्मान केला. 1942च्या काँग्रेस अधिवेशनात गीतगायनासाठी त्यांचीच निवड झाली. ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत व्हावे यासाठी त्यांनी थेट पं. नेहरू आणि घटना समितीसमोर सादरीकरण केले. जरी ‘जन गण मन’ राष्ट्रगीत झाले, तरी वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताइतकाच सन्मान मिळवून देण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोलाचा वाटा राहिला. 1971 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होणारे ते मराठवाड्यातील पहिले सुपुत्र ठरले. संगीत आणि राष्ट्रभक्तीचा अद्वितीय संगम असलेले हे नाव देशाच्या सांगीतिक इतिहासात सदैव तेजाळत राहील.