यंदा मान्सून मे महिन्यातच महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनने सुरुवातीच्या टप्प्यात चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला चांगला पुरेसा पाऊस झाल्यानंतर विश्रांती घेतली. त्यानंतर मात्र कहर झाला. मान्सूनसोबत सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं. यामुळे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर एकामागे एक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले. एक दोन नाही तर तब्बल 16 ते 18 वेळा ही स्थिती निर्माण झाली.
advertisement
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मिळून ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर झाला. यामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र कमी दाबाचा पट्टा देखील तयार झाला आहे असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 30 सप्टेंबरपर्यंत धो-धो पाऊस कोसळणार आहे. मराठवाड्यात प्रंचड पडलेला पाऊस, त्यासोबत आजूबाजूच्या नद्यांनी घेतलेलं रौद्र रुप यामुळे होतं नव्हतं सगळं गेलं आहे.
दिवसेंदिवस पावसाळ्यात प्रणाली बंगालच्या उपसागरातील वाढत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अचानक हवामानात बदल झाला आहे. यंदा मान्सून लवकर आला आणि परतीचा प्रवासही लांबणीवर गेला आहे. 5 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राहणार आहे. याशिवाय मान्सूनआधी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मधे अधे अवकाळी पाऊस देखील येत होता. आता डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम राहू नये हीच भीती बळीराजाला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मागच्या ५ वर्षांपासून हळूहळू मराठवाड्यात पाऊस वाढत आहे. 2015 साली सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू प्रत्येक वर्षी पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. यंदा तर पावसानं कहर केला आहे. काही ठिकाणी गळ्यापर्यंत तर काही ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी साचलं आहे. घरं, जनावरं, सगळं काही वाहून गेलं आहे.