बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांतर कुणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले. भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाशिक जिल्ह्याच्या वाटेला आणखी एक मंत्रीपद आले.
त्यामुळे, आता भुजबळ देखील नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर देखील दावा करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच आता भाजपचे 'संकटमोचक' मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
advertisement
गिरीश महाजन काय म्हणाले?
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर भुजबळांच्या दाव्याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता, त्यांनी म्हटले की, असा दावा करणं काही वाईट आहे का, असा सवाल केला. त्यानंतर महाजन यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं. ते तिसरे उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात. हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे की कोणाला पालकमंत्री आणि कोणाला उपमुख्यमंत्री करायचं?", असं म्हणतं महाजन यांनी पालकमंत्रिपदाच्या वक्तव्यावर भाष्य केले.
पालकमंत्रिपदावरून वाद चिघळणार?
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात तिढा आहे. तर, नाशिक पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्येच दावे-प्रतिदावे रंगले आहेत. अशातच आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी रंगणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.