किरण सूरज दाढे असं आत्महत्या करणाऱ्या महिला कबड्डीपटूचं नाव आहे. ती सावनेरमधील माळेगाव टाऊन परिसरातील रहिवासी होती. तर स्वप्निल जयदेव लांबघरे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण दाढे यांचं स्वप्निल जयदेव लांबघरे याच्यासोबत २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने लग्न झालं होतं. स्वप्निलने किरणला वेकोलीमध्ये नोकरी लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं. यामुळे आर्थिक अडचणीतून सुटका होईल, या आशेने किरणनं हे नातं स्वीकारलं होतं.
advertisement
शिवीगाळ आणि धमक्या देत केला छळ
मात्र, लग्नानंतरही स्वप्नीलने किरणला माहेरीच ठेवलं होतं. स्वप्निलकडून नोकरी लावून देण्याबाबत सतत टाळाटाळ केली जात होती. तसेच, तो वारंवार शरीर संबंधासाठी दबाव आणत होता आणि तिला मानसिक त्रास देत होता. नोकरी लावून देणं तर दूरच राहिले, उलट स्वप्निल किरणला धमक्या आणि शिवीगाळ करत होता. एवढंच नव्हे तर स्वप्नीलने अलीकडेच दोघांच्या घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.
विष प्राशन करून संपवलं जीवन
या त्रासाला कंटाळून किरणने ४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले. तिला तातडीने उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ७ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.
गुन्हा दाखल होताच आरोपी पती फरार
सावनेर पोलिसांनी या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घडल्यापासून आरोपी पती स्वप्निल जयदेव लांबघरे हा फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन एका महिला खेळाडूला नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याच्या आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या या घटनेने सावनेर परिसरात खळबळ उडाली आहे.
