51 वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून 7.08 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी पोलिसांनी 40 वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. ही चोरी 15 जानेवारीला झाली, जेव्हा मीरा रोडमध्ये राहणारी महिला मत देण्यासाठी घराबाहेर गेली होती. महिला मत देऊन घरी परतली तेव्हा तिला घरात कुणीतरी घुसल्याचं लक्षात आलं. यानंतर तिने घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये तपासणी केली, तेव्हा बेडरूममध्ये लाकडाच्या कपाटाचं लॉकर तोडण्यात आलं होतं आणि 7.08 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने गायब झाले होते.
advertisement
चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा त्यांना एका महिलेवर संशय आला. या संशयावरून पोलिसांनी 17 जानेवारीला त्या महिलेला ताब्यात घेतलं, चौकशीदरम्यान तिने चोरी केल्याचं कबूल केलं आहे.
आरोपी महिलेकडून पोलिसांनी सगळे दागिने जप्त केले आहेत. तसंच तिच्यावर घरफोडी आणि चोरीसंबंधी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मीरा भाईंदर-वसई विरारचे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा मदन बल्लाळ यांनी दिली आहे.
