या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत. गुलाब खाजा शेख असं गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्या हाताला गोळी चाटून गेली असून त्याचा हात रक्तबंबाळ झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या महागांव वाकोडी परिसरात अवैध पद्धतीने वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे आपल्या पथकासह कारवाई करण्यासाठी गेले होते. पोलीस पथक घटनास्थळी गेल्यानंतर वाळू माफियांनी पोलिसांवर हल्ला केला. काही आरोपींनी सुनील अंबुरे यांना मारहाण केली.
advertisement
यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबुरे यांनी दोन राऊंड फायर केले. यात एक आरोपी जखमी झाला आहे. गुलाब खाजा शेख असं जखमी झालेल्या आरोपीचं नाव आहे. या चकमकीनंतर चार आरोपी फरार झाले आहेत. सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. पण वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी अशाप्रकारे गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
