जळगाव : राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा-भाच्यांचे अपहरण करत तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची थरारक घटना जळगावात उघडकीस आली. मात्र, चित्रपटाला लाजवेल अशा वेगवान आणि धाडसी कारवाईत शनिपेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी या तरुणाची सुखरूप सुटका केली. या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
advertisement
जळगावातील गोलाणी मार्केट परिसरात मोबाईल साहित्य विक्रीचा व्यवसाय करणारे कृष्णकुमार चौधरी आणि त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. त्या बहाण्याने दोघांना ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत बोलावून घेतले. तेथे चाकूचा धाक दाखवत भाच्याला बांधून ठेवण्यात आले, तर मामालाही धमकावत ताब्यात घेण्यात आले. तू मला मारण्याची सुपारी दिली आहे, असा खोटा आरोप करत आरोपींनी दोघांनाही भीती दाखवली.
मामाला काय धमकी दिली?
यानंतर आरोपींनी दोघांना दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने नेत अकोल्यात एका ठिकाणी डांबून ठेवले. भाच्याला ओलीस ठेवत त्याला सोडवायचे असल्यास 20 लाख रुपयांची खंडणी घेऊन येण्याची धमकी कृष्णकुमार चौधरी यांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चौधरी यांनी प्रसंगावधान राखत पहाटे जळगाव गाठले आणि थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कशी सुटका केली?
अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करत तत्काळ हालचाली केल्या. मोबाईल लोकेशन व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथक पहाटेच अकोल्यात दाखल झाले. अवघ्या तासाभरात सापळा रचून यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत गणपतलाल माळी यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
पुढील तपास सुरू
शनिपेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद आणि समन्वयपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
