छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेची अखेर युती झाली आहे. शिवसेना 25 तर भाजप 27 जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. पण, असं असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतुल सावे, भागवत कराड यांची गाडी अडवून "युती तोडा, युती तोडा' अशी घोषणाबाजी केली आहे.
advertisement
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची बैठक अखेरीस पार पडली. दिवसभरापासून जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेरीस संध्याकाळी जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा केली आहे.
"शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजप २७ ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे, त्याखाली ग्रामपंचायतही लढणार आहे. त्याच प्रमाणे शिवसेना ही २५ जिल्हा परिषद निवडणुकीच्या जागा लढतील. फक्त सिल्लोडमध्ये ११ जागी आमची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. सिल्लोडमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढणार आहे. आतापर्यंत ५२ ठिकाणी आमची युती झाली आहे. लवकरच यादीची घोषणा केली जाणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचा होईल, असा विश्वास अतुल सावेंनी व्यक्त केला.
सिल्लोडमध्ये युती नाही, सत्तारांच्या बालेकिल्ल्यात भाजप लढणार
तर, ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील 11 ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. सिल्लोड सोयेगावमध्ये ते ना मुख्यमंत्री आल्यावर बैठकीला आले, ना कामाला आले नाही. पालकमंत्र्यांना फोन केला तरीही ते आले नाही. सकाळी त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. स्वबळावर लढणार असं म्हणाले आहे. आता आम्हीही त्या ठिकाणी आमचे एबी फॉर्म देणार आहोत. मैत्रीपूर्ण लढत नाही. तिथे आम्ही एकमेकांविरोधात लढणार आहोत' असं अतुल सावेंनी स्पष्ट केलं.
तसंच, 'आता शिवसेना त्यांच्यावर (अब्दुल सत्तार) यांच्यावर काय निर्णय घेते किंवा ते वेगळा पक्ष काढून लढणार आहे, हे पाहावं लागणार आहे. पण, त्यांनी जर फॉर्म दिले तर आम्ही ११ ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे करणार आहोत. सिल्लोडमध्ये शंभर टक्के युती नाही, असंही अतुल सावे यांनी ठणकावून सांगितलं.
युती तोडा, भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
"महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणानंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच गाडी अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ झाला होता. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी रोज व्यक्त केला.
"अनेक वर्ष आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र ती जागा शिवसेनेला केली आहे आणि तेही भाजपच्या नेत्यांना शिव्या देणाऱ्या व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसा गोंधळ छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता तीच गत आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्यापासूनच झाली आहे.
असा आहे महायुतीचा फॉर्म्युला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गटांपैकी 25 जागा या शिवसेना लढणार आणि 27 जागा भाजप लढणार
सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील 11 ठिकाणी युती झाली नाही. त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार.
सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यातील ११ जागांवर युती करणार नाही. मी स्वतंत्र लढणार, असं शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे त्यामुळे तिथं युती झाली नाही.
