वय वर्ष 70 असलेल्या पुण्यातील ताराबाई ज्ञानेश्वर ढोणे या आजीबाईंनी आपला स्वतःचा वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 1988 साली पुण्यात त्यांनी वडापाव विक्रीची सुरुवात केली. ताराबाईंनी सुरुवातीला पुण्यात शेंगा विक्रीची गाडी सुरू केली होती. पुढे त्यांनी व्यवसाय वाढवला आणि त्यातून वेगवेगळे पदार्थ विक्री करण्यास सुरुवात केली.
advertisement
ताराबाई ढोणे या मूळच्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील खेड्यातील रहिवासी आहेत. मात्र पतीच्या निधनानंतर ताराबाईंनी पुण्याची वाट धरली आणि घराच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी छोटा-मोठा व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला.
ताराबाई सांगतात की, माझं शिक्षण जरी जास्त झालेलं नाही, तरी मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी सोडली नाही. पतीच्या निधनानंतर देखील मुलांच्या भविष्यासाठी गाव सोडून पुणे गाठले आणि शून्यातून विश्व निर्माण केले. आज माझ्या दोन्ही मुलांच्या सोबतीने वडापाव विक्रीतून स्वप्न साकार केली.
वडापावच्या व्यवसायातून शेती आणि घराचे स्वप्न साकार
ताराबाईंनी त्यांची मुले मोठी झाल्यानंतर वडापावचा व्यवसाय सुरू केला. पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय आजही उत्तमरीत्या सुरू आहे. सकाळी साडेआठ ते संध्याकाळपर्यंत हा वडापावचा गाडा सुरू असतो. स्टॉलवर वडापाव सोबत भजी, दाल वडा असे अनेक पदार्थ ताराबाई विकतात. वडापावच्या माध्यमातून त्यांनी एक एकर जागा आणि पुण्यात तीन मजली घर बांधले आहे.