मागील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडहून येणाऱ्या वस्तूंवर 32% आयात शुल्क लावले. हा कर युरोपियन युनियनच्या 20% करापेक्षा जास्त आहे. स्विस सरकारने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे आणि हा प्रकार लाजीरवाणा असल्याचे म्हटले आहे.
स्वित्झर्लंडला वाटले होते की, युरोपियन युनियनपासून वेगळी भूमिका घेणाऱ्या आणि लवचिक धोरणं असलेल्या देशाला अमेरिका विशेष वागणूक देईल, पण तसे झाले नाही.
advertisement
स्वित्झर्लंड हे सोने शुद्ध करणारे जागतिक केंद्र आहे. येथे Valcambi, PAMP, Metalor यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग कंपन्या आहेत. ज्या 99.99% शुद्धता असलेले सोने तयार करतात. अनेक देशांतून कच्चे किंवा अशुद्ध सोने स्वित्झर्लंडमध्ये आणले जाते आणि शुद्ध सोने तयार केले जाते.
अमेरिकेत विशेष साइजच्या सोन्याच्या बार्सची मागणी असते. बहुतांश व्यवहार 100 औंस म्हणजेच अंदाजे 3.1 किलोच्या बार्समध्ये होतो. युरोप आणि इतर देशांत हे प्रमाण वेगळे आहे. उदा- 400 औंसचे बार्स. त्यामुळे अमेरिकेतील मागणी वाढली की, जुने मोठे बार्स लंडनहून स्वित्झर्लंडला पाठवले जातात. तिथे वितळवले जातात आणि मग अमेरिकेला 100 औंसच्या बार्सच्या स्वरूपात पाठवले जातात.
ज्या वेळी जगात आर्थिक अनिश्चितता वाढते. जसे की ट्रम्प यांच्या टॅरिफचा निर्णय त्यावेळी बँका, गुंतवणूकदार आणि गोल्ड ईटीएफ फंड मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष सोने (physical gold) खरेदी करतात. या गुंतवणुकीसाठी शुद्ध, स्टँडर्ड क्वालिटी असलेले सोने आवश्यक असते जे स्वित्झर्लंडमध्ये तयार होते.
या व्यवहारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार नात्यांवर परिणाम झाला आहे. स्विस नॅशनल बँकेचे अर्थतज्ज्ञ लॉरेंस विच्ट यांनी सांगितले की, जगात जेव्हा सोन्याची मागणी वाढते तेव्हा स्वित्झर्लंडच्या व्यापार आकडेवारीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हे आकडे पाहून अमेरिकेसोबत खरा व्यापार तफावत किती आहे, हे समजणे कठीण होते.
डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात स्वित्झर्लंडने अमेरिकेला एकूण ४१४ टन सोने निर्यात केले. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या आधीच अमेरिकेत सोन्याची मागणी वाढली होती. १०० औंसच्या बार्सची गरज होती, आणि म्हणून हे सोने लंडनहून स्वित्झर्लंडमार्गे अमेरिकेत पाठवले गेले. यामुळे व्यापार आकडेवारीत स्वित्झर्लंडचा अमेरिका सोबत व्यापार सरप्लस खूप वाढलेला दाखवला गेला. प्रत्यक्षात मात्र हा एक आर्थिक गुंतवणुकीचा व्यवहार होता. व्यापाराचा नव्हे.
स्विस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर सोने वगळून व्यापार आकडे पाहिले तर अमेरिका सोबतचा व्यापार अधिशेष खूपच कमी आहे. त्यामुळे ट्रम्प सरकारने जे टॅरिफ लावले ते चुकीच्या आकड्यांच्या अर्थानुवादावर आधारित आहेत. सध्या तरी स्वित्झर्लंडने चीन प्रमाणे कोणतीही कारवाई करण्याचे संकेत दिलेले नाहीत.
