जगभरातील ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा सर्वात मोठा लेऑफ होणार आहे याचे संकेत मिळत आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. 2022 पेक्षाही यावेळी जास्त कर्मचारी काढले जातील अशी माहिती समोर आल्यानंतर धाकधूक वाढली आहे. 2022 च्या अखेरीस 27 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं.
advertisement
यामुळे ई कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठा धक्का होता. कंपनीच्या एकूण 1.55 मिलियन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी, सुमारे 3,50,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 10 टक्के कर्मचाऱ्यांवर AI मुळे थेट संकट येणार आहे. या मोठ्या कपातीमागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण म्हणजे कंपनीचा वाढलेला खर्च कमी करणे आणि दुसरे, कोरोना काळात जेव्हा मागणी वाढली होती, तेव्हा कंपनीने गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरती केले होते. या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी कंपनी आता कठोर पाऊल उचलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अॅमेझॉनने डिव्हाइसेस, कम्युनिकेशन्स आणि पॉडकास्टिंगसह अनेक विभागांमध्ये नोकरीची कपात आधीपासून सुरू आहे. नवीन भरती सध्या थांबवली आहे.
या विभागांना बसणार फटका
येत्या काही दिवसांत होणाऱ्या या कपातीचा फटका कंपनीच्या अनेक प्रमुख विभागांना बसणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ह्युमन रिसोर्सेस (ज्याला पीपल एक्सपीरियन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जाते), डिव्हाइसेस अँड सर्व्हिसेस आणि ऑपरेशन्स यासह अनेक महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. सूत्रांनुसार, ज्या टीम्सवर परिणाम होणार आहे, त्यांच्या व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यापूर्वी सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नोकर कपातीची सूचना मिळण्यास सुरुवात होईल.
एआय आणि नोकरशाहीवर सीईओंचा वार
यापूर्वीच अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी कंपनीतील अतिरिक्त नोकरशाही कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये व्यवस्थापकांची संख्या कमी करण्यावर त्यांचा भर होता. जून महिन्यात त्यांनी स्पष्ट केले होते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर भविष्यात नोकरी कपातीस कारणीभूत ठरू शकतो.
ई-मार्केटर विश्लेषक स्काय कॅनेव्हस यांच्या म्हणण्यानुसार, "अॅमेझॉन आता कॉर्पोरेट टीम्समध्ये AI-driven productivity पुरेशी वाढवत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची लक्षणीय कपात करणे शक्य झाले आहे." दीर्घकाळात AI infrastructure केलेल्या गुंतवणुकीचा खर्च भरून काढण्यासाठी कंपनीवर सध्या अल्प-मुदतीमध्ये खर्च कमी करण्याचा दबाव आहे.
