पिंपरीतील शारदा डांगे यांनी पारंपरिक पदार्थ बनवण्याच्या आवडीला व्यवसायात रूपांतरित केलं. 2018 सालापासून त्यांनी बाहेरच्या ऑर्डर्स घेण्यास सुरुवात करत स्वतःचा उद्योग उभारला. गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या उकडीच्या मोदकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवाळीच्या फराळालाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे, त्यांचे पदार्थ पुण्यापुरते मर्यादित न राहता दुबई आणि अमेरिकेतही पोहोचले आहेत.
advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील शारदा डांगे लग्नानंतर पिंपरीत स्थायिक झाल्या. पती अनिल नोकरी करतात, तर मुलगी अनिषा शिक्षण घेत आहे. लहानपणापासून उकडीचे मोदक बनवण्याची आवड असलेल्या शारदा यांनी त्या छंदालाच व्यवसायाचं रूप दिलं. त्यांच्या मोदकांच्या अनोख्या चवीमुळे गणेशोत्सवापुरतेच नव्हे, तर वर्षभर मागणी असते. मोदकांची मागणी पिंपरी-चिंचवडमधील मदर तेरेसा आश्रमासह विविध संस्थांकडूनही केली जाते. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत दररोज सुमारे 300 मोदकांचे बुकिंग होते.
10 दिवसांत सुमारे 35 हजार रुपयांची उलाढाल
गेल्या वर्षी गणेशोत्सवात 1400 मोदकांचे बुकिंग झाले होते. प्रतिमोदक 25 रुपयांप्रमाणे, दहा दिवसांत सुमारे 35 हजार रुपयांची उलाढाल झाली होती. यंदाही त्यांनी सांगितलं की, अंदाजे 35 ते 40 हजार रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या फराळाला आंतरराष्ट्रीय मागणी
दिवाळीत चकल्या, शंकरपाळे, चिवडा, रवा-बेसनाचे लाडू या पारंपरिक पदार्थांची मागणी खूप असते. हे पदार्थ दुबई आणि अमेरिकेत पाठवले जातात. काही ग्राहकांकडून या पदार्थांना वर्षभर मागणी असते, असेही शारदा सांगतात.