Gold Price Prediction: सोन्याच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर त्यात पुन्हा घसरण सुरू झाली. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. सोन्याच्या दराने आपला सर्वाधिक किंमतीचा उच्चांक गाठल्यानंतर आता जवळपास ८१६० रुपयांनी सोनं स्वस्त झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षात सोन्याचा दर किती असेल, यावर आता एक्सपर्टने अंदाज वर्तवला आहे.
advertisement
येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत आणखी एक लक्षणीय वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लक्ष्मी डायमंड्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेतन मेहता यांनी 'सीएनबीसी टीव्ही १८' सोबत बोलताना सोन्याच्या दराबाबत भाकित वर्तवले. मेहता यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय मध्यवर्ती बँका आणि मोठ्या गुंतवणूकदारांकडून वाढलेली खरेदी सोन्याच्या किमतींना सतत पाठिंबा देत आहे .
मेहता यांनी स्पष्ट केले की, यावर्षी दागिन्यांच्या खरेदीपेक्षा गुंतवणूक सोन्याची खरेदी अधिक मजबूत झाली आहे. मात्र लग्नाचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांच्या खरेदीत पुन्हा वाढ होईल. दिवाळीदरम्यान विक्री चांगली होती, परंतु त्यानंतर सुमारे १० ते १५ दिवस मंदी होती. आता, बाजारात पुन्हा मागणी वाढू लागली असल्याचे त्यांनी म्हटले.
दिवाळीदरम्यान, ४० ते ५० टक्के ग्राहक नवीन दागिन्यांसाठी जुने सोने बदलत होते. मेहता यांच्या मते, चालू तिमाहीत हा वाटा सुमारे २० ते २५ टक्के असू शकतो. लोक मोठ्या आणि अधिक चांगल्या, नव्याने डिझाइन केलेल्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी त्यांचे जुने सोने बदलत आहेत.
नवीन वर्षात सोन्याचा दर किती?
दिवाळीच्या सुमारास सोन्याच्या किमतीत आधीच १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. आता पुढील आणखी दोन ते तीन महिन्यात सोन्याच्या दरात आणखी १० ते २० टक्के वाढ होऊ शकते. याचाच अर्थ सोन्याच्या दरात येत्या दोन-तीन महिन्यात १२ ते २४ हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे.
हिऱ्यांच्या दागिन्यांना मागणी...
हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मागणीबाबत मेहता म्हणाले की, बाजार स्थिर आहे. जडलेल्या दागिन्यांची मागणी नेहमीसारखीच मजबूत आहे. मोठ्या आकाराच्या सॉलिटेअर हिऱ्यांची विक्री थोडीशी कमकुवत झाली असली तरी, लहान आणि मध्यम वजनाच्या हिऱ्यांची खरेदी वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
खरेदीदार आता साध्या सोन्यापेक्षा हिऱ्यांच्या दागिन्यांना प्राधान्य देत आहेत. मेहता यांनी स्पष्टपणे सांगितले की जागतिक खरेदी आणि देशांतर्गत मागणी दोन्ही भविष्यात सोन्याच्या किमती वाढवू शकतात. येणारे महिने गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी महत्त्वाचे असतील असेही त्यांनी म्हटले.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून कोणताही गुंतवणूक विषयक सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
