मुंबई : कामाच्या निमित्ताने, शिक्षणासाठी किंवा व्यवसायामुळे घरापासून दूर राहणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर इतर अनेक शहरांतही विद्यार्थी, नोकरदार आणि स्थलांतरित कुटुंबे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे अनेक घरमालकांनी आपली घरे भाड्याने दिली आहेत. अशा भाडेकरू आणि घरमालक या दोघांसाठीच 1 जानेवारी 2026 पासून नवे भाडेकरार नियम लागू करण्यात आले आहेत, नियम न पाळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी हे नियम जाणून घेणे अत्यावश्यक झाले आहे.
advertisement
देशात भाड्याने राहणाऱ्यांची वाढती संख्या आणि भाडेविषयक वाद लक्षात घेऊन केंद्र सरकारने भाडेप्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी हे नवे नियम अंमलात आणले आहेत. यामुळे भाडेकरूंचे संरक्षण होणार असून, घरमालकांनाही निश्चित हक्क मिळणार आहेत.
भाडेकरूंसाठी महत्त्वाचे बदल
नव्या कायद्यानुसार, भाड्याने घर घेणाऱ्यांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे भाडेकराराची नोंदणी. घर भाड्याने घेतल्यानंतर दोन महिन्यांच्या आत भाडेकराराची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच लेखी रेंट अॅग्रीमेंटशिवाय घरात राहिल्यास भाडेकरूंचे नुकसान होऊ शकते.
सिक्युरिटी डिपॉझिटवर मर्यादा घालण्यात आली आहे. अनेक ठिकाणी घरमालकांकडून अवाजवी ठेव रक्कम घेतली जात होती. आता निवासी घरांसाठी जास्तीत जास्त दोन महिन्यांचे भाडे इतकीच सिक्युरिटी डिपॉझिट घेता येईल. व्यावसायिक जागेसाठी ही मर्यादा सहा महिन्यांच्या भाड्यापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
भाडेवाढीबाबतही स्पष्ट नियम करण्यात आले आहेत. घरमालकाला कराराच्या कालावधीत अचानक भाडे वाढवता येणार नाही. करार संपल्यानंतरच आणि आधी सूचना देऊनच भाडेवाढ करता येईल. तसेच भाडेकरूला कोणतीही पूर्वसूचना न देता घर रिकामे करण्यास भाग पाडता येणार नाही.
भाड्यासंबंधी वाद लवकर निकाली काढण्यासाठी भाडे न्यायालये आणि भाडे लवाद स्थापन करण्यात आले असून, 60 दिवसांत प्रकरण निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
घरमालकांसाठी दिलासादायक तरतुदी
नव्या नियमांमुळे घरमालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. भाड्याच्या उत्पन्नावर लागणाऱ्या टीडीएसची मर्यादा 2.4 लाखांवरून थेट 6 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे कर भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. तसेच सलग तीन वेळा भाडे न भरल्यास घरमालक थेट भाडे लवादाकडे जलद कारवाईसाठी जाऊ शकतो.
घराच्या दुरुस्ती किंवा ऊर्जा-कार्यक्षम सुधारणा करणाऱ्या घरमालकांना राज्य सरकारच्या योजनांनुसार कर सवलतींचा लाभ मिळण्याची शक्यताही आहे.
ऑनलाइन भाडेकरार नोंदणी कशी कराल?
भाडेकराराची नोंदणी आता ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. संबंधित राज्याच्या मालमत्ता नोंदणी पोर्टलवर जाऊन घरमालक आणि भाडेकरूंची ओळखपत्रे अपलोड करावी लागतील. भाड्याचे सर्व तपशील भरून ई-स्वाक्षरीद्वारे करार सादर करता येईल.
