केवळ राजस्थानच नव्हे, तर थेट मुंबईपर्यंत या धाडींचे धागेदोरे पोहोचले असून कोट्यवधींच्या करचोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
33 ठिकाणं आणि 300 पेक्षा जास्त अधिकारी
प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण शाखेने अत्यंत गोपनीयरीत्या या कारवाईचे नियोजन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, कोटा, श्रीगंगानगर, करौली, हिंडौन आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशा एकूण 33 ठिकाणांवर 'आयकर'चे पथक पोहोचले आहे.
advertisement
जयपूर: कारवाईचा सर्वाधिक जोर जयपूरमध्ये आहे, जिथे 25 ठिकाणी तपास सुरू आहे.
उदयपूर: 3 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.
इतर शहरे: कोटा, करौली, हिंडौन, श्रीगंगानगर आणि मुंबईत प्रत्येकी एका ठिकाणी तपास पथके कार्यरत आहेत.
रेड सुरु करण्याच्या दिवशी काही भागांत हवामान खराब असल्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या पथकांना नियोजित स्थळी पोहोचण्यास थोडा उशीर झाला. मात्र, हवामानाचा अडथळा दूर सारत अन्वेषण शाखेच्या टीमने कान्हा ग्रुपच्या संचालकांच्या घर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापेमारी सुरू केली.
धाडीमागचं नेमकं कारण काय?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कान्हा ग्रुपच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याच्या तक्रारी प्राप्तिकर विभागाला मिळाल्या होत्या. गोपनीयरीत्या या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. रोख स्वरूपातील व्यवहार आणि अघोषित मालमत्तेचा शोध या मोहिमेद्वारे घेतला जात आहे.
2008 मध्ये 'कान्हा' या नावाने सुरू झालेला हा रेस्टॉरंट समूह अतिशय कमी वेळात लोकप्रिय झाला. पारंपरिक मिठाई, विविध प्रकारचे नमकीन आणि उत्तमोत्तम जेवणामुळे या ग्रुपने राजस्थानच्या बाहेरही आपले पाय पसरले आहेत. मात्र, आता या वेगाने वाढणाऱ्या व्यवसायावर प्राप्तिकर विभागाची 'वक्रदृष्टी' पडल्याने समूहाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
या छापेमारीत आतापर्यंत किती रोकड किंवा दागिने जप्त झाले, याची अधिकृत माहिती अद्याप विभागाने दिलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे राजस्थानच्या उद्योग आणि रेस्टॉरंट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
