इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे मिडल ईस्टमधील देशांना होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्याचा परिणाम किमतीवर होण्याची शक्यता आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती चार टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यामुळे किंमत 74 डॉलर प्रति बॅरल एवढी झाली. जाणकारांच्या मते येत्या काळात कच्च्या तेलाचा पुरवठा एक मिलियन प्रति बॅरल एवढा डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर ब्रेंट क्रुड ऑइलच्या किमती 80 डॉलर प्रतिबॅरलपेक्षा वाढत जातील ही शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. इराणने इस्रायलवर हल्ला करताच तेलाच्या किमतींचं गणित बदललं आहे. दुसरीकडे अमेरिकी क्रुड ऑइलच्या किमतीही वाढत आहेत.
advertisement
भूराजकीय संबंधांचा परिणाम तेलाच्या किमतीवर होतो हे आपण नेहमीच पाहत आलो आहे. आता अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे अनेक आखाती देश इराणच्या बाजूने उभे राहत आहेत. त्यामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी ओपेक प्लसच्या बैठकीत तेलाचा पुरवठा सुरळीत राखण्याबाबत विचार केला जाण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलच्या किमती 80 डॉलर किंवा त्या पलीकडे गेल्या तर भारतात निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता मावळेल. सध्या भारत सुमारे 85 टक्के क्रुड ऑइल आयात करतो. क्रुड ऑइलच्या किमती कमी झाल्या तर भारतावरील ताण कमी होतो. देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करायलाही त्याची मदत होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलच्या किंमत वाढली की त्याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसतो. आरबीआयच्या रिपोर्टनुसार भारत एकुण आयातीच्या सुमारे 25 टक्के क्रुड ऑइल मिडल ईस्ट आणि रशियाकडून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि भारतातील महागाई यांचा जवळचा संबंध आहे.