दिवाळीचा सण तोंडावर आलाय. त्यासाठी आधीपासून ज्यांनी बचत केली असेल, त्यांची दिवाळी तर गोड होईलच; पण ज्यांना ते शक्य झालं नसेल किंवा कंपनीकडून बोनसही मिळाला नसेल, तर त्यांच्याकडे पीएफ खात्याचा पर्याय आहे. पीएफ खात्यातून सणाच्या कारणासाठी पैसे काढता येत नसले, तरी घरखरेदी किंवा घरदुरुस्ती आदी कारणांसाठी पैसे मिळू शकतात. दिवाळीच्या औचित्याने कोणाला घराशी संबंधित कामं करायची असतील, तर पीएफचा पर्याय वापरता येऊ शकतो. तसंच, पैशाची अडचण कधीही निर्माण होऊ शकते. त्यासाठी पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी असते. त्यासाठी काही नियम मात्र पाळावे लागतात. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून कधी व किती वेळेला पैसे काढू शकता, हे जाणून घेऊ या, . ‘इंडिया टीव्ही’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
advertisement
कोणत्या कारणासाठी पैसे काढता येतात?
- घरासाठी जमीन खरेदी करणं, घराची दुरुस्ती, कुटुंबातली व्यक्ती किंवा स्वतःचं लग्न, मुलांचं शिक्षण, नोकरी गेली असेल, कुटुंबीयांचं किंवा स्वतःचं आजारपण या गरजांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.
- लग्नासाठी पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला नोकरीमध्ये 7 वर्षं पूर्ण झालेली असली पाहिजेत. तसंच तुम्ही जितके पैसे भरले आहेत, त्याच्या 50 टक्केच रक्कम तुम्ही काढू शकता.
- काही कारणानं तुमची कंपनी 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद असेल, तसंच तुम्ही 2 महिने नोकरीवर हजर झाला नसाल, तर तुम्ही तुमचा संपूर्ण पीएफ काढू शकता.
- घरातली व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः आजारी असून, एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल असाल किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया होणार असेल, तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून 6 महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढू शकता.
- घर खरेदी करण्यासाठी तुम्ही पीएफ खात्यातून 36 महिन्यांच्या पगाराइतकी आगाऊ रक्कम काढू शकता. त्यासाठी तुम्ही नोकरीची 5 वर्षं पूर्ण केलेली असली पाहिजेत.
- घरासाठी जमीन खरेदी करणं किंवा घराची दुरुस्ती करणं यासाठी पैसे काढायचे असतील, तर नोकरीला 5 वर्षं पूर्ण झालेली असावी लागतात. जमीन खरेदी करण्यासाठी 24 महिन्यांच्या आणि घर दुरुस्तीसाठी 12 महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढता येऊ शकतात.
- घरासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी 36 महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढता येतात; मात्र त्यासाठी तुमच्या नोकरीची 10 वर्षं पूर्ण झालेली असली पाहिजेत.
- शिक्षणासाठी पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येते. त्यासाठी नोकरीत 7 वर्षं पूर्ण पाहिजेत. तसंच तुमच्या योगदानाच्या 50 टक्क्यांइतकीच रक्कम तुम्हाला काढता येते.
पीएफ योजना ही नोकरदार व्यक्तींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर ठेवण्यासाठी आखलेली आहे; मात्र काही नियम जाणून घेतल्यास नोकरीच्या काळातही त्यातून काही रक्कम आगाऊ काढता येऊ शकते.
