मुहूर्त ट्रेडिंगचा मुहूर्त
आजवर जे घडलं नव्हतं, ते यंदा घडलं आहे. 67 वर्षांची मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा यंदा मोडली आहे. 67 वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेनंतर, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणारे मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र पहिल्यांदाच संध्याकाळऐवजी दुपारी आयोजित केले जाणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार, यावर्षी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दुपारी 1:45 ते 2:45 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. दुपारी 1:15 ते 1:30 या वेळेत ब्लॉक डील सेशनने सुरू होईल त्यानंतर दुपारी 1:30 ते 1:45 या वेळेत प्री-ओपन सेशन होईल. विशेष मुहूर्त ट्रेडिंग सेशन दुपारी 1:45 ते 2:45 या वेळेत चालेल, त्यानंतर ट्रेड मॉडिफिकेशन विंडो दुपारी 3:15 पर्यंत सुरू राहणार आहे.
advertisement
बदलामागचे मुख्य कारण काय?
१९५७ मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (BSE) मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा सुरू केली, तेव्हापासून हे सत्र नेहमी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेत आयोजित केले जात होतं. याच कालावधीमध्ये संध्याकाळी लक्ष्मीपूजन देखील केलं जायचं. मात्र, ब्रोकरेज इंडस्ट्रीकडून गेल्या अनेक वर्षांपासून या वेळेत बदल करण्याची जोरदार मागणी होत होती. याचे मुख्य कारण म्हणजे, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासोबत ही पूजा करायला मिळावी, दिवाळीचं सेलीब्रेशन करता यावं यासाठी ही मागणी होती. या मागणीचा विचार करुन यंदा हा बदल करण्यात आला आहे.
ट्रेडिंग सत्र संध्याकाळी संपले तरी, स्टॉक एक्सचेंज आणि ब्रोकरेज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना 'पोस्ट-ट्रेड प्रोसेस' म्हणजेच व्यवहारांशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागायचं. कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणे अशक्य व्हायचं आणि याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या दिवाळी साजरी करण्यावर होत होता. त्यांना दिवाळीच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येत नव्हता.
ब्रोकर्सची मागणी यशस्वी
या बदलामध्ये ब्रोकर इंडस्ट्री स्टँडर्ड फोरम आणि 'धन' (Dhan) चे सह-संस्थापक जय प्रकाश गुप्ता यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गुप्ता यांनी उदाहरण देत सांगितले की, मागील वर्षी जरी मुहूर्त ट्रेडिंग 8 वाजण्यापूर्वी संपले असले तरी, कर्मचाऱ्यांना रात्री 11 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबावे लागले होते. ही अडचण लक्षात घेऊन इंडस्ट्रीतील अनेकांनी वेळेतील बदलाला पाठिंबा दिला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ धीरज रेली यांनी या निर्णयाचे स्वागत करत, "संध्याकाळऐवजी दुपारची वेळ अधिक व्यावहारिक (Practical) आहे. यामुळे पोस्ट-ट्रेड प्रक्रिया शांतपणे पूर्ण होतील आणि कर्मचाऱ्यांना कुटुंबासोबत सण साजरा करता येईल," असे मत व्यक्त केले.
भविष्यात बदल होण्याची शक्यता?
एक्सचेंज अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावेळी शुभ मुहूर्त दुपारी आणि रात्री 11 वाजण्याच्या आसपास होता. सर्व एक्सचेंजेसच्या सहमतीने दुपारी ट्रेडिंगचा निर्णय घेण्यात आला. सध्याचा हा बदल कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे आणि जर सर्व बाजार सहभागी भविष्यातही सहमत झाले, तर ही दुपारच्या वेळेची परंपरा कायमस्वरूपी (Permanent) केली जाऊ शकते, अशी आशा उत्तम बागडी यांनी व्यक्त केली आहे.