परदेशातील सुखाचा त्याग आणि स्वदेशी व्यवसायाचे स्वप्न
पुष्कर चोरडिया याने आर्किटेक्चरमधील पदव्युत्तर शिक्षण (Masters) ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले. परदेशात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही, त्याचे मन तिथे रमले नाही. आपल्या मातृभूमीत परत येऊन काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर घरच्यांच्या संमतीने तो नाशिकला परतला आणि एका नामांकित कंपनीत आर्किटेक्ट म्हणून नोकरीला लागला.
advertisement
सोलापूरच्या ११ वीतील मुलीने फक्त ५०० रुपयांत बनवला 'अनोखा हीटर' Video
'मे, तुम और चाय'ची सुरुवात
नोकरी करत असतानाच काहीतरी स्वतःचे असावे या विचारातून त्याने त्याची मैत्रीण सुकन्या हिच्या सोबतीने 'मे, तुम और चाय' या संकल्पनेवर आधारित एका मिनी रोड कॅफेची सुरुवात केली. साधारण वर्षभरापूर्वी सुरू झालेला हा प्रवास सोपा नव्हता. काही काळानंतर सुकन्याला वैयक्तिक कारणास्तव या व्यवसायातून बाहेर पडावे लागले. मात्र, पुष्कर डगमगला नाही. त्याने आपला व्यवसाय सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार केला.
मैत्रीची साथ आणि यशाची भरारी
व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पुष्करने आपला जवळचा मित्र शुभम आणि त्याची बहीण याना सोबत घेतले. शुभम स्वतः एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. आता हे तिघे आपली दिवसभराची कॉर्पोरेट नोकरी संपवून सायंकाळी पूर्ण जोशात हा कॅफे चालवतात. नाशिककरांचा या मिनी कॅफेला मोठा प्रतिसाद मिळत असून, यातून होणारी आर्थिक प्रगती कौतुकास्पद आहे.
नोकरीच्या पगारातून केवळ गरजा पूर्ण होतात, पण व्यवसायामुळे मी माझी स्वप्ने पूर्ण करू शकत आहे, असा विश्वास पुष्कर चोरडिया व्यक्त करतो. आजचा तरुण नोकरीच्या मागे धावत असताना, उच्चशिक्षित असूनही रस्त्यावर चहाचा स्टॉल लावून सन्मानाने जगणाऱ्या पुष्करचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.