हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात आहे. विशेष म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून तत्कालीन रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी ते बांधले होते. आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं ठीक आहे, पण इथले लोक तिकीट काढूनही प्रवास का करत नाहीत? चला तर मग आम्ही तुम्हाला या मागचे मनोरंजक कारण सांगतो…
advertisement
या अनोख्या स्टेशनचे नाव आणि पत्ता
उत्तर प्रदेशातील या रेल्वे स्टेशनचं नाव दयालपूर आहे. दोन माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांनी त्याच्या बांधकामात योगदान दिले असल्याने, ऐतिहासिकदृष्ट्या या रेल्वे स्थानकाला बरेच महत्त्व आहे. 5 दशकांपासून हे रेल्वे स्टेशन आसपासच्या भागातील लोकांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन होते, परंतु 2016 मध्ये येथून कामकाज बंद करण्यात आले.
मजबुरीमुळे बंद, मागणीमुळे पुन्हा उघडले
हे स्टेशन बंद करण्याचे कारण भारतीय रेल्वेशी संबंधित अटी आणि शर्ती होत्या, परंतु दयालपूर स्टेशन या अटी पूर्ण करू शकले नाही. म्हणून ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादे स्टेशन मुख्य रेल्वे मार्गावर असेल, तर तेथे दररोज किमान 25 तिकिटांची विक्री व्हायला हवी. पण, दयालपूर स्थानकात तसे होत नसल्याने ते बंद करण्यात आले.
ग्रामस्थांनी अवलंबली ही पद्धत
हे रेल्वे स्टेशन 6 दशके जुने आहे. यामुळे दयालपूर आणि आसपासच्या गावातील लोकांनी मोहीम राबवून रेल्वेला ते पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले. लोकांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने 2022 मध्ये हे स्टेशन पुन्हा सुरू केले.
हे स्टेशन फक्त हॉल्टच्या रुपात सुरु करण्यात आले होते आणि येथे फक्त 1-2 ट्रेनच थांबायच्या. यानंतर स्थानिक लोकांनी संकल्प केला की, हे स्टेशन बंद होऊ दिले जाणार नाही. यामुळे येथील लोक आपसात वर्गणी करुन रोज कमिती कमी विक्रीचं टार्गेट पूर्ण करतात.