ही गोष्ट आहे आंध्र प्रदेशातील वेमिरेड्डी प्रशांती रेड्डी यांची. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'एडीआर' (ADR) च्या अहवालानुसार, प्रशांती रेड्डी यांनी केवळ आंध्र प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील सर्वात श्रीमंत महिला आमदार म्हणून नाव नोंदवले आहे. त्यांच्या संपत्तीचे आकडे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नेल्लोर जिल्ह्यातील कोवूर (Kovur) मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रशांती रेड्डी यांची एकूण संपत्ती तब्बल 716 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ही संपत्ती अचल आणि चल मालमत्तेच्या स्वरूपात आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातील महिला आमदारांची सरासरी संपत्ती 74 कोटी रुपये असताना, प्रशांती रेड्डी यांची संपत्ती या सरासरीच्या कित्येक पट अधिक आहे.
advertisement
केवळ बँकेतील पैसेच नाही, तर त्यांच्या ताफ्यात सुमारे 19 आलिशान गाड्या आहेत. यामध्ये मर्सिडीज बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू आणि टोयोटा वेलफायर यांसारख्या अतिमहागड्या वाहनांचा समावेश आहे.
राजकारण आणि उद्योगाचा 'पावरफुल' संगम
प्रशांती रेड्डी यांचे पती वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी हे स्वतः एक प्रख्यात उद्योजक आणि राजकारणी आहेत. ते सध्या नेल्लोर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. वेमिरेड्डी कुटुंब हे खाणकाम (Mining), पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि कंत्राटी क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांची 'व्हीपीआर मायनिंग इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी देशभर मोठ्या प्रकल्पांवर काम करते. एक यशस्वी उद्योजिका म्हणून प्रशांती रेड्डी या व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळतात.
राजकारणात येण्यापूर्वीच प्रशांती रेड्डी यांनी आपल्या समाजकारणाने लोकांच्या मनात जागा मिळवली होती. 'व्हीपीआर फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी नेल्लोर जिल्ह्यात शेकडो शुद्ध पिण्याच्या पाण्याचे (RO) प्रकल्प उभारले आहेत. गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण असो वा मोफत आरोग्य शिबिरे, या सेवाकार्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला.
प्रशांती रेड्डी यांच्यासोबतच त्यांची कन्या नीलिमा रेड्डी यादेखील आता कौटुंबिक व्यवसाय आणि सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे वेमिरेड्डी कुटुंबाचा हा वारसा भविष्यातही राजकारणात आणि उद्योगात आपला प्रभाव कायम ठेवणार, यात शंका नाही.
