TRENDING:

कोणे एके काळी बेकरीत घासली भांडी; आज देश-विदेशांत आहेत 50हून अधिक डोसा प्लाझा

Last Updated:

प्रेम गणपती 20 प्रकारचे डोसे बनवायचे. नवनव्या प्रकारचे डोसे खाण्यासाठी ग्राहक गर्दी करू लागले.

advertisement
मुंबई : तमिळनाडूतल्या प्रेम गणपती यांना त्यांच्या मित्राने महिना 1200 रुपये पगाराची नोकरी देण्याचं आश्वासन देऊन मुंबईत आणलं; मात्र रेल्वे स्टेशनवरच तो प्रेम गणपती यांच्याकडचे सारे पैसे घेऊन पळून गेला. अनोळखी शहर, अनोळखी भाषा आणि पुन्हा घरी जाण्यासाठी पैसेही नाहीत, अशी रीतीने प्रेम गणपती यांच्यापुढे खूपच समस्या होत्या. काही तास त्यांनी विचार करत रेल्वे स्टेशनवर काढले आणि पुन्हा घरी न जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या अनोळखी गल्ल्यांमध्ये आपलं भविष्य शोधण्याचा इरादा त्यांनी पक्का केला आणि त्यांच्या याच ठाम निश्चयाने त्यांच्या नशिबाची दारं उघडली. अर्थात, त्यांनी कठोर परिश्रमही केले. त्यातूनच ते आज प्रसिद्ध डोसा प्लाझा चेनचे मालक आहेत. कोणे एके काळी स्वतः धाब्यावर भांडी घासण्याचं काम केलेले प्रेम गणपती आज देश-विदेशात हजारो जणांना रोजगार देत आहेत.
सक्सेस स्टोरी
सक्सेस स्टोरी
advertisement

प्रेम गणपती यांचा जन्म तमिळनाडूत नागलपुरममध्ये झाला. ते सात भाऊ-बहीण होते. त्यांचं कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठत होतं. 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्रेम गणपती चेन्नईला आले आणि छोटी-मोठी कामं करू लागले. त्यांना मासिक 250 रुपये मिळत. त्यातले बरेचसे पैसे ते घरी पाठवत. चेन्नईत एकाशी त्यांची ओळख झाली. त्याने मासिक 1200 रुपये पगाराच्या नोकरीचं आश्वासन देऊन त्यांना मुंबईत नेलं; पण त्याने मुंबईत पोहोचल्यावर रेल्वे स्टेशनवरच त्यांना फसवलं.

advertisement

बांद्रा रेल्वे स्टेशनवर प्रेम गणपती त्या मित्राची वाट पाहत बराच वेळ उभे राहिले. तो त्यांच्याकडचे सगळे पैसेही घेऊन गेला होता. तो परतलाच नाही. तिथे त्यांच्या ओळखीचं कोणी नव्हतं. मराठी, हिंदी या भाषाही त्यांना येत नव्हत्या. तरीही मुंबईतच राहायचं त्यांनी नक्की केलं. माहीममधल्या एका बेकरीवाल्याकडे त्यांनी नोकरी मागितली. त्याने त्यांना मासिक 150 रुपये पगारावर भांडी घासण्याचं काम दिलं. काही दिवसांनंतर त्यांनी जवळच्याच एका ढाब्यावर डोसा बनवण्याचं कामही सुरू केलं. त्यातून त्यांना थोडे जास्त पैसे मिळू लागले.

advertisement

अनेक वर्षं नोकरी केल्यानंतर 1992 साली प्रेम गणपती यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एक ठेला कराराने घेऊन त्यांनी इडली आणि डोसा विकायला सुरुवात केली. त्यासाठी एक हजार रुपये गुंतवणूक केली. नंतर त्यांनी आपल्या दोन भावांनाही मुंबईला बोलावलं. डोसा बनवण्यात प्रेम गणपती माहीर होते. त्यामुळे लवकरच त्यांची चर्चा होऊ लागली आणि व्यवसाय सेट झाला.

advertisement

प्रेम गणपती 20 प्रकारचे डोसे बनवायचे. नवनव्या प्रकारचे डोसे खाण्यासाठी ग्राहक गर्दी करू लागले. कमाई वाढल्यानंतर 1997 साली प्रेम गणपती आणि त्यांच्या भावांनी मुंबईत वाशी भागात एक छोटी जागा लीजवर घेतली आणि तिथे रेस्टॉरंट उघडलं. प्रेम सागर डोसा प्लाझा असं त्याचं नाव ठेवलं. 2002पर्यंत त्यांचं आउटलेट खूप लोकप्रिय झालं.

एका रेस्टॉरंटवर ते खूश नव्हते. त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवायला सुरुवात केली आणि फ्रँचायझी मॉडेल अंगीकारलं. आज डोसा प्लाझाची देशातल्या 50हून अधिक शहरांत आउटलेट्स आहेत. तसंच, न्यूझीलंडमध्ये तीन, तर ऑस्ट्रेलियातही दोन आउटलेट्स आहेत. दुबईतही लवकरच डोसा प्लाझाचं आउटलेट सुरू होणार आहे, अशी माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
कोणे एके काळी बेकरीत घासली भांडी; आज देश-विदेशांत आहेत 50हून अधिक डोसा प्लाझा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल