मुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे प्रमुख के. कृतिवासन (K Krithivasan) यांनी दोन महिन्यांपूर्वी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की- कंपनी आपल्या 2 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच 12,000 हून अधिक लोकांना कामावरून कमी करणार आहे. आता त्याचा थेट परिणाम TCS च्या कर्मचाऱ्यांवर दिसत असून, गेल्या काही आठवड्यांत अचानक आणि जबरदस्तीने झालेल्या राजीनाम्यांमुळे कंपनीत भीती, असुरक्षितता आणि ताणतणावाचे वातावरण तयार झाले आहे.
advertisement
आयटी युनियन आणि TCS कर्मचारी यांचा दावा आहे की- खरी कर्मचारी कपात अधिकृत आकड्यांपेक्षा खूपच जास्त असू शकते. मनीकंट्रोलला या माहितीची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. पण काही सूत्रांचं म्हणणं आहे की ही संख्या 30,000 पेक्षा जास्त असू शकते.
एका मिड-लेव्हल कर्मचाऱ्यारी जो राष्ट्रीय स्तरावरील आयटी युनियनचा सदस्य आहे, त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जूनपासून आतापर्यंत जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांनी आमच्याशी थेट संपर्क साधला आहे. त्यामुळे कपात 30,000 पेक्षा वर जाईल. कारण कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा द्यायला सांगितले जाते. त्यामुळे हे TCS च्या अधिकृत नोंदींमध्ये दिसणार नाही, फक्त अॅट्रिशन रेटमध्ये परावर्तित होईल.
आयटी युनियन्सचा विरोध
गेल्या काही महिन्यांत AIITEU, FITE, UNITE आणि KITU सारख्या आयटी युनियन्सनी TCS मधील कपातीविरोधात निदर्शने आणि मोहिमा चालवल्या आहेत. मात्र कंपनीतील एका सूत्राने सांगितले की- युनियन्स फक्त चर्चेत राहण्यासाठीच मोठे आकडे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, TCS इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कमी करून कामकाज सुरू ठेवू शकत नाही, विशेषतः जेव्हा कंपनीला नवनवीन डील्स मिळत आहेत.
मनीकंट्रोलने ई-मेलद्वारे विचारलेल्या प्रश्नांना कंपनीने उत्तर दिले नाही. कारण कंपनी Q2 निकालांपूर्वीच्या साइलेंट पिरियडमध्ये आहे.
कर्मचाऱ्यांचे अनुभव
रोहन (बदललेलं नाव) (३५ वर्षे) मागील १३ वर्षांपासून TCS मध्ये काम करत होता. त्याने सांगितले की HR आणि RMG (रोल मॅनेजमेंट ग्रुप) कडून जवळपास ५ महिन्यांच्या "हॅरासमेंट" नंतर त्याला राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. रोहन म्हणाला, जेव्हा मला राजीनामा द्यायला सांगितला, तेव्हा मला टाटा ग्रुप कंपनीकडून धोका झाल्यासारखे वाटले. मी १० वर्षांहून अधिक वेळ दिला होता. सुरुवातीला मी राजीनामा दिला नाही, पण नंतर २०२५ च्या मध्यात मला काढून टाकण्यात आले.
त्याने पुढे सांगितले की- बेंचवर असताना त्याला ६–८ लाख रुपयांची रिकव्हरी रकम भरायला सांगितली. त्यातील अर्धी रक्कम ग्रॅच्युटी आणि पेड लीव्हमधून समायोजित झाली, उर्वरित TCS ने सेटल केली.
रोहन पूर्वी एका मोठ्या ऑटोमोटिव्ह क्लायंटसाठी ५ वर्षांच्या प्रोजेक्टवर होता. तो संपल्यानंतर फक्त १ वर्षाचा प्रोजेक्ट मिळाला. नंतर त्याला नवीन प्रोजेक्ट मिळवण्यात अडचणी आल्या कारण त्या क्षेत्रात TCS कडे जास्त डील्स नव्हत्या. इतर मॅनेजर्सशीही संपर्क केला पण उपयोग झाला नाही.
बेंचवर असताना HR आणि RMG वारंवार कॉल करून विचारत होते – नवीन प्रोजेक्टसाठी अप्लाय केले का? स्किल्स कुठे वापरल्या जाऊ शकतात? ट्रेनिंग घेत आहात का? हळूहळू कॉल्स वाढत गेले. एक दिवस तर त्याचे कंपनीचे सिस्टीम आणि नेटवर्क अॅक्सेसही बंद करण्यात आले.
रोहन म्हणाला, माझ्यावर मूनलाइटिंगचा आरोप केला. त्यावेळी मला मानसिक छळ सहन करावा लागला. सध्या मी पुण्यात ४ महिन्यांपासून नवीन नोकरी शोधत आहे आणि एका मित्राच्या घरी राहतो. कुटुंबाला अजूनही याबद्दल सांगितलेले नाही.
ऑफिसमधील भीती आणि ताण
TCS च्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की- ऑफिसमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणालाच माहिती नाही की पुढची वेळ कोणाची असेल. माझ्या ऑफिसमध्ये ८–१० वर्षांचा अनुभव असलेल्या सीनियर्सना HR कडून अचानक ई-मेल येतो आणि लगेच नोकरी सोडायला सांगितले जाते. काहींना एका आठवड्याचा नोटिस, तर काहींना तत्काळ बाहेर.
त्याने पुढे सांगितले की, संपूर्ण टीम्सवरही गदा आली आहे. नव्या टेक प्रोजेक्ट्सवर असणारे कर्मचारीही प्रभावित झाले. क्लायंट्स खर्च कमी करत असल्याने TCS ला कमी लोकांची गरज आहे. जुनियर्सना अजून प्रोजेक्ट मिळत आहेत पण फारच हळूहळू.
कर्मचाऱ्यांच्या मनात दहशत
अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की- मॅनेजर्सकडे फ्लुइडिटी लिस्ट असते. यात कामावरून काढून टाकायच्या कर्मचाऱ्यांची नावे असतात. हे लिस्ट स्किल्स किंवा अनुभवावर आधारित नसून डिलिव्हरी मॅनेजर्स किंवा सीनियर मॅनेजमेंटच्या निर्णयावर अवलंबून असते.
विजय (बदललेलं नाव) म्हणाला, ही लिस्ट ग्रेड, रेटिंग किंवा स्किल्सवर नाही. चांगली रेटिंग आणि डिमांड असलेले कर्मचारीही यात येतात. हे फक्त मानसिक त्रास देण्यासाठी आहे. हे सामान्य परफॉर्मन्सवर आधारित प्रक्रिया नाही. या लिस्टमधील नाव असलेल्या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांत HR बोलावते. त्यांना दोन पर्याय दिले जातात – स्वतः राजीनामा द्या किंवा कंपनी काढून टाकेल. काही वेळा क्लायंट्सना चुकीची कारणं सांगितली जातात जसे – कर्मचारी आजारी आहे, चाइल्डकेअर इश्यूज आहेत; पण खरी कारणं म्हणजे नोकर कपात असते.
युनियन्सचा आरोप
FITE चे सचिव प्रशांत पंडित म्हणाले, ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ३० मिनिटांत राजीनामा द्यायला लावले जात आहे. आयटी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन होत आहे. UNITE चे महासचिव अला गुनाम्बी वेल्किन यांनी सांगितले की, काही कर्मचाऱ्यांना प्रोजेक्टवर असूनही बेंचवर टाकले गेले आणि नंतर राजीनाम्यासाठी बोलावण्यात आले. त्यांनी सांगितले- कामावरुन काढून टाकल्यास झाल्यास वेतन मिळत नाही. पण राजीनामा दिल्यास ३ महिन्यांचा नोटिस पीरियड, एक्सपीरियन्सनुसार पॅकेज, करिअर असेसमेंट, आउटप्लेसमेंट गाईडन्स आणि ६ महिन्यांचे इन्शुरन्स कव्हरेज मिळते – तेही कर्मचाऱ्याने स्वतः भरायचे.
TCS ची नवीन पॉलिसी
कृतिवासन यांनी पूर्वी सांगितले होते की, कंपनी नवीन तंत्रज्ञान, विशेषतः AI आणि ऑपरेटिंग मॉडेल बदलावांवर लक्ष केंद्रित करत आहे. भविष्यात कोणत्या स्किल्सची गरज आहे यावर कंपनी काम करत आहे. जूनमध्ये कंपनीने नवी पॉलिसी लागू केली. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने RMG शी स्वतः संपर्क साधून प्रोजेक्ट मिळवावा लागेल. प्रत्येक वर्षी किमान 225 दिवस बिलेबल (काम करण्यायोग्य) असणे आवश्यक आहे. जर कोणी हा टार्गेट पूर्ण करू शकला नाही तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि गरज पडल्यास नोकरीही जाऊ शकते. तसेच कर्मचारी वर्षभरात 35 दिवसांपेक्षा जास्त बेंचवर राहू शकत नाही.