भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)ने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आपले कार्यालय 13 वर्षांनंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात माध्यमांच्या अहवालातून माहिती समोर आली आहे. जून 2025 मध्ये कंपनीने हे कार्यालय बंद केले आहे. या ऑफिसमधील गोष्टी हळूहळू शिफ्ट केल्या जात आहेत. ही बातमी तेव्हा समोर आली जेव्हा टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी मध्य प्रदेशचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांची भेट घेऊन त्यांना या परिस्थितीची माहिती दिली.
advertisement
टीसीएसच्या भोपाळ शाखेच्या या निर्णयामुळे शहराच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण टीसीएस मध्य प्रदेशातून वर्षाला 500 कोटी रुपयांचा व्यवसाय करते आणि यामुळे जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
ऑफिस बंद का होत आहे?
भोपाळ शाखा बंद करण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत त्यांना माहिती दिली जात आहे. सूत्राच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी टीसीएसच्या सीईओला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले की, टीसीएस सप्टेंबर 2025 पर्यंत आपली भोपाळ शाखा बंद करण्याची योजना आखत आहे. राज्याला हे कार्यालय सुरू राहावे अशी इच्छा आहे. जसे की अहमदाबाद, पाटणा, लखनऊ, भुवनेश्वर आणि कोची येथे कार्यरत आहे. हे ऑफिस बंद झाल्यामुळे राज्याला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होऊ शकते आणि हजारो लोकांच्या नोकरी जाण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
टीसीएस कार्यालय बंद झाल्यामुळे केवळ नोकऱ्यांवरच परिणाम होणार नाही; तर राज्याला आर्थिक धक्काही बसू शकतो. हे कार्यालय मध्य प्रदेशातील उद्योग आणि व्यापारासाठी महत्त्वाचे होते आणि टीसीएसचा 500 कोटी रुपयांचा व्यवसाय राज्याला मोठा कर महसूल मिळवून देत होते. भोपाळ कार्यालयात सुमारे 1,000 कर्मचारी काम करत होते आणि आता त्यांना रोजगाराच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. जर टीसीएसने कार्यालय पूर्णपणे बंद केले तर या कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधाव्या लागतील. ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.