1) कधीकधी भावनिक खरेदी म्हणजेच भावनिक ट्रिगर ही बाब देखील पैसे खर्च होण्यासाठी कारणीभूत ठरते. आपल्या भावना अस्वस्थ असताना किंवा खूप आनंदी असताना आपण चुकीचे निर्णय घेतो. आपल्याला एका गोष्टीची गरज असल्यास आपण दोन-तीन गोष्टींची खरेदी करतो. बहुतांश लोक खरेदीला थेरेपी मानतात. पण, ही थेरपी तुमचं आर्थिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे खरेदी करताना नेहमी याकडे लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही गरज म्हणून खरेदी करत आहात की भावनेच्याभरात.
advertisement
2) स्वतःवर किती पैसे खर्च होतात, याची नोंद ठेवली पाहिजे. आपण केव्हा, कुठे आणि किती पैसे खर्च केले याचा हिशेब तुम्हाला मानसिकदृष्ट्या सावध करेल आणि हळूहळू तुमचा खर्च आवश्यक असलेल्या गोष्टींपुरताच मर्यादित होईल. काही अनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर नियंत्रण ठेवता आलं असतं, हे तुमच्या स्वतःच्याच लक्षात येईल. हे लक्षात आल्यावर, तुमचा मेंदू तुम्हाला पुढील अनावश्यक खरेदीबद्दल सतर्क करेल.
3) खर्चाचं नियोजन करणं हा बचतीचा सर्वोत्तम मार्ग आहे. वडिलांकडून पॉकेटमनी घेत असो किंवा स्वतः कमवत असो, प्रत्येकाने महिन्याच्या सुरुवातीला बजेट बनवलं पाहिजे. मोबाईलमधील नोटपॅडवर किंवा कोणत्याही ॲपद्वारे महिन्याचं आर्थिक नियोजन मांडता येतं. महिनाभरात किती खर्च होईल, याचा अंदाज तयार केला पाहिजे आणि त्यानुसार खर्च केला पाहिजे.
4) सोशल मीडियाचा अधिक वापर केल्यामुळे देखील अनावश्यक खरेदी ट्रिगर होते. स्क्रोल करत असताना विविध ई-कॉमर्स साइट्सच्या जाहिराती दिसतात. अनेकदा तुम्ही त्यांच्यावर क्लिक करता आणि तुम्हाला काहीतरी खरेदी करण्याचा मोह निर्माण होतो. यातून तुम्ही अशा वस्तू देखील खरेदी करता ज्यांची तुम्हाला गरज नाही. अशा परिस्थितीत इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या ॲप्सचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.
5) स्वत:ला आर्थिक गुंतवणुकीची सवय लावली पाहिजे. म्हणजेच पैसे कुठे गुंतवायचे याचं नियोजन करता आलं पाहिजे. जर तुम्हाला एसआयपी, आरडी किंवा एफडी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे वाचवावे लागतील. पैसे वाचवणं आणि गुंतवणूक करणं हे तुमचं ध्येय असेल तर तुम्ही आपोआप खर्चाला आवर घालाल.