UIDAI जे आधार कार्ड KYC केले नाहीत किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त काळाहून अधिक केवायसी करायचे बाकी आहेत अशा सगळ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर 1.4 कोटींहून अधिक आधार क्रमांक बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये मृत व्यक्तींच्या नावाचाही समावेश आहे. मृत व्यक्तींच्या नावे सरकारी योजनांचा घेणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी आणि हे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय गेल्या वर्षी सुरू झालेल्या सरकारच्या सफाई अभियान अंतर्गत घेण्यात आला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश सरकारी योजनांमध्ये होणारा गैरव्यवहार थांबवून सार्वजनिक पैशांचा योग्य वापर करणे हा आहे. मृत व्यक्तींच्या आधार क्रमांकाचा गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक होते, असं त्यांनी सांगितलं.
2 कोटी आधार नंबर बंद करण्याचे लक्ष्य
सध्या आधार कार्ड 3,300 पेक्षा जास्त सरकारी योजनांशी जोडलेले आहे. साधारण दोन कोटी मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे मृत्यू नोंदणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य नाही. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत आणि आधार डेटाबेसमध्ये मोठा फरक दिसून येतो.
अनेक प्रकरणांमध्ये आधार क्रमांक मृत्यूच्या नोंदीमध्ये पूर्णपणे चुकीचा किंवा अपूर्ण असतो. याशिवाय, हे आकडेवारीचे विविध वित्तीय आणि गैर-वित्तीय संस्थांमध्ये विखुरलेले असल्यामुळे त्याची तपासणी करणे अत्यंत कठीण होते. UIDAI या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध सरकारी विभागांसोबत मिळून काम करत आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक निधीचा होणारा गैरवापर थांबेल आणि खऱ्या गरजूंपर्यंत योजनांचा लाभ पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास आहे.
तुमचं आधार कार्ड, बायोमेट्रीक वेळोवेळी अपडेट करुन घेणं गरजेचं आहे. जर एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याचं आधार कार्ड योग्य वेळेत बंद करणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे असे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी हे करण्याचं आवाहन UIDAI ने केलं आहे.