दिल्ली: 'पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. याचा अर्थव्यवस्थेसाठी पश्चिम बंगालला मोठा फायदा होईल. गेल्या दशकात, रिलायन्सने राज्यातील गुंतवणूक २ हजार कोटी रुपयांवरून ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. जे २०३५ पर्यंत १ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे" अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी केली. आज 5 फेब्रुवारी रोजी ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ते उपस्थितीत होते.
advertisement
बंगाल ग्लोबल समिटमध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी एकूण 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या. जिओबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोलकाता येथील डेटा सेंटरचे रूपांतर अत्याधुनिक एआय-रेडी डेटा सेंटरमध्ये केलं जात आहे आणि ते पुढील ९ महिन्यांत तयार होईल. हे डेटा सेंटर बंगालला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड संगणनासारखे तंत्रज्ञान प्रदान करेल. ज्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत मिळेल'
रिटेल क्षेत्रात अंबानी यांनी पुढील तीन वर्षांत ४०० नवीन स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली. सध्या, रिलायन्स पश्चिम बंगालमध्ये १,३०० हून अधिक स्टोअर्सचे नेटवर्क चालवते, जे तीन वर्षांत १,७०० पर्यंत वाढवले जाईल. यामुळे नवीन नोकऱ्याही निर्माण होतील. रिलायन्सने आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये विविध क्षेत्रात १ लाखाहून अधिक नोकऱ्या दिल्या आहेत.
मुकेश अंबानी यांनीही या परिषदेत बंगालच्या कारागिरांना जागतिक मान्यता देण्याचं आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले की, 'स्वदेश' बंगालच्या कारागिरांच्या उत्पादनांना जगभरात उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. लंडन, न्यू यॉर्क आणि पॅरिसमध्ये स्वदेश स्टोअर्स उघडले जातील ज्यामध्ये बंगालमधील सर्वोत्तम जामदानी आणि तंत साड्या, बलुचरी, मुर्शिदाबाद, बिष्णुपूर आणि तुसार सिल्क साड्या, कांथा साड्या, मसलिन तसंच बंगालमध्ये बनवलेल्या जूट आणि खादी उत्पादनांची विक्री केली जाईल.
सौरऊर्जेला भविष्यातील ऊर्जा स्रोत म्हणून वर्णन करताना ते म्हणाले की, रिलायन्स बंगालच्या हरित अर्थव्यवस्थेत योगदान देऊ इच्छिते. आमचे ब्रीदवाक्य आहे: "सोनार बांगला साठी सौर बांगला". आणि आम्ही सौर ऊर्जा क्षेत्रात योगदान देण्यास तयार आहोत' असंही यावेळी अंबानी म्हणाले.
रिलायन्स फाउंडेशन, राज्य सरकारच्या सहकार्याने, कालीघाट मंदिराचे नूतनीकरण करत आहे. मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना मुकेश अंबानी म्हणाले, “ममता दीदी, आम्हाला सेवा करण्याची ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे वैयक्तिकरित्या आभार मानू इच्छितो. आमचे फाउंडेशन राज्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.'