मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर सतत एक्सप्रेस आणि लोकलची सतत वर्दळ असते. त्यामुळे रेल्वेला उशिर होतो. दररोज रेल्वे उशिरा धावत असल्यामुळे चाकरमान्यांना रोजच ऑफिसमध्ये लेटचा शेरा मिळताना दिसतो. आता अशातच नोकरदार वर्गाचा हा लेटमार्कचा शेरा आता काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. कारण की, मध्य रेल्वेने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई सीएसएमटी आणि दादरवरून धावणाऱ्या एकूण 10 एक्सप्रेसच्या मार्गामध्ये मोठा बदल केला जाणार आहे. मुंबई सीएसएमटीवरील 5 एक्सप्रेस आणि दादरवरून सुटणाऱ्या 5 एक्सप्रेसच्या मार्गांमध्ये बदल केला जाणार आहे. या एक्सप्रेसला आता पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर शिफ्ट केले जाणार आहे.
advertisement
मध्य रेल्वेकडून घेतलेल्या ह्या निर्णयामुळे मुख्य मार्गांवरील ताण कमी होणार आहे. यामुळे उपनगरीय लोकल रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय, पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा वापर रेल्वेकडून केला जाणार आहे. तिथून एक्सप्रेस सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते कर्जत- खोपोली आणि सीएसएमटी ते कसारा या मार्गावरील ताण लक्षणियरित्या कमी होणार आहे. यामुळे लोकल वेळेवर धावतील आणि नोकरदारांना वेळेवर आपल्या ऑफिसमध्ये पोहोचता येईल. 10 एक्सप्रेसचा मार्ग बदलल्यामुळे तब्बल 15 नवीन लोकलचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पीक अवर्समध्ये तब्बल 40 ते 50 हजार अतिरिक्त प्रवासी प्रवास करणं शक्य होणार आहे.
दररोज लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसमुळे मुंबई लोकल तब्बल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पिक अवर्समध्ये नागरिकांना हा विशेष त्रास सहन करावा लागतो. सध्या थंडीच्या दिवसांमध्ये उत्तर भारतातील अनेक एक्सप्रेस धुक्यामुळे उशिराने धावत असतात. त्याचा थेट परिणाम सकाळच्या गर्दीच्या वेळेत मुंबई लोकल सेवांवर होत होता. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या स्थानकांवर या एक्सप्रेस वळवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलात राज्यराणी एक्सप्रेस, नागरकोइल एक्सप्रेस, दादर- तिरुनेलवेली सुपरफास्ट एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस यांसह इतर काही गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय, या गाड्यांच्या डब्यांची संख्या 16- 20 वरून वाढवून 24 करण्याचा निर्णयही मध्य रेल्वेने घेतला आहे.
