महाराष्ट्र बनलाय देशाचा मेट्रो हब
एमएमआरडीएने अंधेरी पश्चिम–मांडाले मेट्रो 2 बी मार्गिकेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण करत मोठी झेप घेतली आहे. तब्बल 30.45 हेक्टर परिसरात उभारलेले हे बहुमजली कारशेड अत्याधुनिक तंत्रज्ञान, भविष्यातील गरजा आणि पर्यावरणपूरक सुविधांचा समावेश असलेले असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.
एकाचवेळी 72 मेट्रो गाड्यांना जागा देणार
या कारशेडमध्ये एकाचवेळी तब्बल 72 मेट्रो गाड्या थांबविण्याची क्षमता आहे. दोन स्तरांवर उभारण्यात आलेल्या या प्रचंड स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक मजल्यावर 36 गाड्या उभ्या करण्याची सुविधा आहे. मेट्रो गाड्यांच्या दैनंदिन तांत्रिक तपासणी, दुरुस्ती, स्वच्छता, पार्किंग तसेच सर्व आधुनिक सुविधा या कारशेडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कारशेडमध्ये बांधण्यात आलेले 29 किलोमीटरचे रुळांचे जाळे देशातील सर्वांत मोठे असल्याचा दावा करण्यात आला असून गाड्यांच्या गतिमान चाचण्यांसाठी आणि ऑपरेशनल ट्रायल्ससाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
advertisement
एमएमआरडीएच्या मते, या संपूर्ण प्रकल्पामुळे मेट्रो 2बी मार्गिकेची गती वाढणार असून मुंबईतील लोकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय निर्माण होणार आहे. अंधेरी ते मंडाले असा हा महत्त्वाचा टप्पा शहरातील पूर्व–पश्चिम जोडणी सुलभ करण्यासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. या पार्श्वभूमीवर डायमंड गार्डन ते मंडाले या उपमार्गिकेचे काम आधीच पूर्ण झाले असून आता नागरिकांना या मार्गिकेच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान ही सेवा नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत एमएमआरडीएने अद्याप निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. मात्र कारशेड पूर्ण झाल्यामुळे पुढील प्रक्रिया वेगाने होणार असून लवकरच हा टप्पा प्रवासीसेवेसाठी खुला करण्यात येईल अशी अपेक्षा नागरिक आणि प्रवासी यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.
