काय आहे नवा नियम
मुंबई महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले असून आता त्यांचा पगार थेट बायोमेट्रिक हजेरीशी जोडला जाणार आहे. 'माय बीएमसी' अॅपवरील ऑक्टोबर 2025 च्या पे-स्लिपनंतर अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. काहींना कमी पगार मिळाल्याने प्रश्न उपस्थित झाले आणि हे प्रकरण नेमकं काय याबद्दल चर्चा रंगली. प्रत्यक्षात बीएमसीने वेळेची शिस्त पाळण्यासाठी हजेरी प्रणाली अधिक कडक केली आहे.
advertisement
असे असतील नवे नियम
आता नव्या नियमांनुसार कर्मचारी वेळेत ऑफिसमध्ये हजर होणे आणि निश्चित वेळेपर्यंत थांबणे अनिवार्य आहे. तसेच 30 मिनिटांपर्यंत उशीर झाल्यास आणि तेवढा वेळ जास्त थांबले नाही तर त्या मिनिटांचे पैसे कापले जातील. तसेच वेळेत येऊन 30 मिनिटे आधी ऑफिस सोडल्यासही तितकी वेतन कपात होईल. एक तास उशीर किंवा लवकर निघाल्यास अर्धा दिवसाची रजा कापली जाईल आणि येण्याची-जाण्याची दोन्ही वेळ पाळली नाही तर पूर्ण दिवसाची रजा वजा केली जाईल.
रजा कशा प्रकारे घेता येणार
पालिका कर्मचाऱ्यांनी रजा घेण्यासाठी आगोदर मंजुरी घेणे बंधनकारक असेल. अचानक रजा लागल्यास तात्काळ अर्ज आणि मंजुरी आवश्यक आहे. मंजुरी न घेता रजा घेतल्यास ती गैरहजेरी म्हणून मोजली जाईल आणि एचआर सिस्टीममध्ये नोंदवली जाईल. अशा परिस्थितीत संबंधित कर्मचारी आणि मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांचे 10 टक्के वेतनही रोखले जाऊ शकते.
बीएमसीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त पाळण्याचे, रजा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या नव्या हजेरी प्रणालीमुळे कामाच्या वेळेची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे कामावर पाट्या टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, कारण अगदी एका मिनिटाचा फरकही वेतन कपातीचे कारण ठरू शकतो.
