मुंबई महापालिका निवडणुकीनंतर जर निकालांचा भौगोलिक नकाशा पाहिला, तर एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते—हिंदुत्वाचा प्रभाव मुंबईत सर्वत्र समान नव्हता, पण तो निर्णायक ठिकाणी अत्यंत प्रभावी ठरला. विशेषतः पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या दोन भागांत प्रचाराचा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने दिसून आला.
निवडणूकपूर्व काळात मुंबई ही एकसंध राजकीय घटक म्हणून चर्चेत होती, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शहर दोन वेगळ्या मानसशास्त्रीय पट्ट्यांत विभागलेलं दिसलं. या दोन्ही पट्ट्यांमध्ये प्रचाराची जबाबदारी खास करून भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे आणि स्थानिक भाजप नेत्यांवर सोपवली होती. त्यामुळे या नेत्यांनी रा भागात हिंदुत्ववादी प्रचाराने वेगवेगळ्या स्वरूपाचा, पण परिणामकारकपणे मांडणी केली.
advertisement
पूर्व उपनगरांपासून सुरुवात केली तर, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, कुर्ला (हिंदूबहुल भाग), तसंच मानखुर्दच्या काही भागांत निवडणूक ही केवळ स्थानिक प्रश्नांवर राहिली नाही. येथे स्थलांतर, झोपडपट्ट्या, अतिक्रमण, कायदा-सुव्यवस्था आणि धार्मिक-सांस्कृतिक असुरक्षितता हे मुद्दे आधीच सामाजिक चर्चेत होते. अशा वातावरणात नितेश राणेंची आक्रमक हिंदुत्वाची भाषा थेट “प्रतिसाद देणारी” ठरली.
पूर्व उपनगरांत त्यांच्या सभांनंतर प्रचाराचा सूर बदललेला दिसला—संरक्षण, ओळख आणि शक्ती यांचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचला. याचा परिणाम म्हणून या पट्ट्यात भाजप उमेदवारांच्या विजयाचा दर अधिक सुसंगत आणि सलग दिसतो. इथं हिंदुत्व हे केवळ भावनिक नव्हे, तर दैनंदिन सुरक्षिततेशी जोडलेलं राजकारण बनलं.
पश्चिम उपनगरांत चित्र काहीसे वेगळे होते. बोरिवली, कांदिवली, मलाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले या भागांत मध्यमवर्गीय, व्यापारी, सेवा क्षेत्रातील मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. इथं निवडणूक निर्णयांवर सोशल मीडिया, राष्ट्रीय राजकारण आणि “मोठ्या फ्रेम”चा प्रभाव जास्त असतो. नितेश राणेंच्या वक्तव्यांनी या मतदारांमध्ये थेट भावनिक प्रतिक्रिया निर्माण केली नाही, पण ध्रुवीकरणाचा स्पष्ट फायदा भाजपला झाला.
पश्चिम उपनगरांत हिंदुत्व हे “संघर्ष” म्हणून नव्हे, तर “ओळखीची खात्री” म्हणून काम करताना दिसलं, कोणत्या बाजूने उभं राहायचं, याचा स्पष्ट सिग्नल मतदारांना मिळाला.
महत्त्वाची बाब म्हणजे, दादर–परळ–लालबागसारख्या पारंपरिक मराठी पट्ट्यांत ठाकरे गटाचा मराठी अस्मितेचा मुद्दा सुरुवातीला प्रभावी वाटत होता. मात्र, जसजशी निवडणूक पुढे गेली, तसतसं तो मुद्दा परिचित आणि पुनरावृत्तीचा ठरू लागला. त्याउलट हिंदुत्वाची आक्रमक मांडणी “नवीन धार” घेऊन आली. परिणामी या भागांत मतांचे पूर्ण ध्रुवीकरण न होता, हिंदुत्व अमराठी विरुद्ध मराठी अस्मिता असा अंतर्गत संघर्ष दिसून आला, ज्यात भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांची तुलना केली, तर एक स्पष्ट निष्कर्ष समोर येतो. पूर्व उपनगरांत नितेश राणेंचे हिंदुत्व हे सक्रिय ऊर्जा बनलं, तर पश्चिम उपनगरांत ते निर्णयाची दिशा ठरलं. दोन्ही ठिकाणी परिणाम वेगळा असला, तरी निकालांच्या दृष्टीने तो भाजपसाठी अनुकूल ठरला.
या निवडणुकीत मराठी अस्मिता पूर्णपणे नाहीशी झाली असं नाही, पण ती निर्णायक ठरली. ती एका सांस्कृतिक आठवणीपुरती अवलंबून राहिली नाही, त्यामुळे त्याचे परिणाम निकालातून दिसून आले. तर दुसरीकडे हिंदुत्व हे सध्याच्या असुरक्षितता, राष्ट्रीय राजकारण आणि शक्तीच्या भाषेशी जोडले गेलं. विधानसभेत 'एक हे तो सेफ है' हे कॅम्पेन त्याचं उदाहरण. आता, ठाकरे गटाचे मराठी–अमराठी आणि अदानी फिअर फॅक्टर हे मुद्दे वातावरण तापवण्यात यशस्वी झाले, पण मतदारांच्या अंतिम निर्णयावर त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला.
निवडणूकनंतरचा एकत्रित आढावा सांगतो की, मुंबईत भाजपची सत्ता येण्यामागे हिंदुत्वाचा भौगोलिकदृष्ट्या अचूक वापर हा महत्त्वाचा घटक ठरला. पूर्व उपनगरांत तो थेट विजयात दिसला, तर पश्चिम उपनगरांत स्थिर, शिस्तबद्ध मतदानातून. या अर्थाने, भाजप नेत्यांचं हिंदुत्व हे मुंबईत सर्वत्र एकसारखे लागू झालं नाही, पण जिथे जिथे ते लागू झालं, तिथे निवडणूक निकालाची दिशा बदलणारे ठरले. हेच या महापालिका निवडणुकीचं सर्वात महत्त्वाचं राजकीय निरीक्षण आहे.
