एकूण 32 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यात सुमारे 65 किलोमीटर रेल्वेमार्गांची उभारणी करण्यात येणार आहे. मार्गिकेमध्ये 6 स्थानके, 8 मोठे उड्डाणपूल, 106 लहान पूल आणि 1 भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1,234 कोटी रुपयांपर्यंत जाणार असून त्यात महाराष्ट्र सरकारचा 50 टक्के वाटा असेल. संरचनात्मक कामे पूर्ण झाल्यानंतर मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. त्यामुळे उपनगरीय गाड्यांची वेळपालन क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारेल.
advertisement
कर्जत- बदलापूर- कल्याण हा मध्य रेल्वेवरील सर्वाधिक प्रवासीभार असलेला मार्ग म्हणून ओळखला जातो. सकाळच्या गर्दीच्या वेळी खोपोली आणि कर्जतहून येणाऱ्या लोकल्स बदलापूरपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पूर्ण भरतात. बदलापुरात आणखी प्रवासी चढल्याने या लोकल्स अक्षरशः खचून जातात. सध्या या मार्गावर फक्त दोन ट्रॅक असल्यामुळे त्याच मार्गावर मेल- एक्सप्रेस आणि मालगाड्याही धावत असल्याने अनेकदा उपनगरीय लोकल सेवा विलंबित होतात. काही वेळा लांब पल्ल्याच्या गाड्यांचे इंजिन बिघडल्यामुळे संपूर्ण खोपोली- कर्जत- बदलापूर- कल्याण रेल्वे सेवा विस्कळीत होते.
तिसरी- चौथी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर या सर्व समस्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल आणि उपनगरी प्रवाशांना अधिक जलद सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर कर्जत- कल्याण शटल सेवा वाढवण्याला चालना मिळेल. ठाणे- कर्जत उपनगरी सेवांमध्येही वाढ अपेक्षित असून प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा ताण कमी होईल. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र ट्रॅक मिळाल्याने माल प्रवाह वेगवान होईल. शिवाय मुंबई- पुणे मार्गावर रेल्वेची क्षमता वाढल्याने दरवर्षी तब्बल 41 लाख लिटर डिझेलची बचत होण्याचा अंदाज आहे ज्यामुळे पर्यावरणीय लाभही मिळणार आहे.
