बेस्टने अलीकडेच भाडेवाढ जाहीर केल्यानंतर सेवा सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या बेस्टकडे 2,700 स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्या असून, यामधून दररोज सुमारे 30 लाख प्रवासी प्रवास करतात. नव्या नियोजनामुळे मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी बससेवा अधिक चांगल्या प्रकारे जोडली जाईल आणि कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचणेही सोयीचे होणार आहे.
advertisement
नवीन वातानुकूलित बस सेवा व श्रेणी सुधारणा:
1) मार्ग क्रमांक ए-25: सध्या बँकबे आगार ते कुर्ला दरम्यान धावणाऱ्या या वातानुकूलित बसचा शेवटचा थांबा आता राणी लक्ष्मीबाई चौक असेल.
2) बस क्रमांक 44: काळा चौकी ते वरळी आगार बसमार्ग सुधारित होऊन वातानुकूलित सेवा म्हणून ए-44 या क्रमांकाने ओळखला जाईल.
3) मार्ग क्रमांक 56: वरळी आगार ते बेसावे यारी रोडदरम्यान धावणाऱ्या या मार्गावर रविवारी वातानुकूलित बस धावेल. इतर दिवशी नियमित सेवा राहील.
4) 125 क्रमांकाची बस: ही सेवा पूर्णतः वातानुकूलित करण्यात येणार असून ए-125 म्हणून चालवली जाईल.
बस मार्ग विस्तारणे व सुधारणा:
1) सी-71 बस: माहीम ते मीरा रोड पूर्व या मार्गाचा विस्तार काला किल्ला बस आगारापर्यंत करण्यात येणार आहे. मार्गात सेनापती बापट मार्ग, रहेजा हॉस्पिटल, बनवारी कंपाउंड हे थांबे समाविष्ट असतील.
2) मार्ग क्रमांक 11 लिमिटेड: नेव्ही नगर ते वांद्रे कॉलनी या मार्गातील बस डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून लालबाग उड्डाणपुलावरून धावणार. यामुळे जिजामाता उद्यान (राणी बाग), जयहिंद सिनेमा, लालबाग येथील थांबे रद्द होतील.
3) बस क्रमांक 25: प्रबोधनकार ठाकरे उद्यान ते विहार सरोवर या मार्गाला नवीन क्रमांक देत आता बस क्रमांक 29 म्हणून ओळखले जाईल.
4) मार्ग क्रमांक 79: सांताक्रूझ आगार ते गोराई आगारापर्यंत जाणारा मार्ग आता चारकोप येथे संपेल.
सेवेच्या वेळा व चालना दिवसात बदल:
मार्ग क्रमांक ए-89: मंत्रालयातून चालणारी ही सेवा फक्त सोमवार ते शनिवार या दिवशीच उपलब्ध असेल. तसेच मार्ग क्रमांक 124: कुलाबा बस स्थानक ते वरळी आगार या मार्गावर सध्या रविवारी वेगळी रचना असते, पण आता ही सेवा संपूर्ण आठवडाभर एकसंध स्वरूपात चालेल.
बदलांचा परिणाम काय होईल?
गर्दीच्या वेळेत मेट्रो स्थानकांना व व्यावसायिक भागांना थेट जोडणी मिळेल. तसेच प्रवाशांना वेगाने पोहोचता येईल, मार्ग सरळ होतील.
वातानुकूलित सेवांमुळे प्रवास अधिक आरामदायक शक्य होईल. अधिकाधिक बस वातानुकूलित व इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहे. 1 जून पासून हे सर्व बदल होणार आहेत.






