नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे सिडको महामंडळाकडून उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रोजेक्ट विकसित करण्यात येणार आहे. एकात्मिक आरोग्यविषयक आणि शैक्षणिक सुविधा, आंतरराष्ट्रीय मानकांचे क्रीडा संकुल आणि कौशल्य केंद्र उभारण्याच्या उद्देशाने उत्कृष्टता केंद्र हा प्रकल्प सिडकोतर्फे विकसित करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रोजेक्टसाठी जमीन विकसित करण्याच्या कामाला गती मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. आंतरराष्ट्रीय एज्युसिटी हा देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून शिकण्याची संधी देशातल्या तरूणांना उपलब्ध होणार आहे.
advertisement
जागतिक दर्जाच्या शिक्षण केंद्रामुळे बहुसांस्कृतिक आदानप्रदान आणि संशोधन यांना चालना मिळणार आहे. ठरवलेल्या वेळेमध्ये ही एज्युसिटी पूर्ण करण्याचा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय एज्युसिटी एक ऐतिहासिक उपक्रम असून ज्यामध्ये एकाच ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सामील केले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने यॉर्क विद्यापीठ, ॲबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयईडी विद्यापीठ या पाच नामांकित परदेशी विद्यापीठासोबत सामंजस्य करारनामा करण्यात आले. सोबतच, नवी मुंबईमध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी शासनाकडून परदेशी विद्यापीठांना इरादापत्रही देण्यात आली आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3 ते 4 किमीच्या परिसरात ही एज्युसिटी उभारली जात आहे. या व्यतिरिक्त मल्टिमोडल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरूनही एज्युसिटीमध्ये येण्यासाठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबईवरून एज्युसिटीमध्ये रस्त्याच्या माध्यमातून येण्यासाठी एक तासाचं अंतर लागेल. ॲरोसिटी, नैना शहर, खारघर कार्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रापासूनही एज्युसिटी खूप जवळ आहे. एज्युसिटी मिळालेल्या जमीनीच्या सपाटीकरणाचे काम आवश्यक असून जमिनींचे सुलभरीत्या वाटप करता यावे म्हणून चार स्वतंत्र भूखंड घेतले आहे. त्या भूखंडाच्या विकासाचे काम केले जाणार आहे. सिडकोकडून भाग 1 आणि भाग 2 मधील 50 हेक्टर जमिनीच्या विकासासह 30 मी. ते 45 मी. रुंद प्रवेश मार्गाचे काम हाती घेण्यात आले.
एज्युसिटीची ई-निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर 45 मी. रुंद मार्गाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 348 (राष्ट्रीय महामार्ग 4बी) जेएनपीटीवरून एज्युसिटीमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पनवेल रेल्वे स्थानक जोडणारी मेट्रो लाईन एम- 24 ची योजना आखत आहे, जी नैना क्षेत्रापर्यंत विस्तारेल आणि प्रस्तावित ॲरोसिटी आणि एज्युसिटीला देखील जोडेल.
