धर्मवीर - 2 हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या सिनेमाबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनात देखील एखादा सिनेमा काढण्याची सुप्त इच्छा देखील बोलून दाखवली आहे, नेमकं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं, पाहूयात
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
धर्मवीर सिनेमाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "धर्मवीर आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता आणि हजारो अनुयायी घडवले. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही टॅगलाईन या सिनेमापूर्ती मर्यादित नाही तर एकनाथजी शिंदे आणि आमच्या जीवनाशी निगडित टॅग लाईन आहे. दिघे साहेबांच्या शिकवणी प्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देत असतील."
advertisement
सिनेमाबाबत काय म्हणाले फडणवीस?
"धर्मवीर 2 सिनेमाच काम सध्या कुठवर आलं ते माहित नाही. पण या चित्रपटात आम्हाला देखील एखादा रोल मिळायला पाहिजे होता. कदाचित आम्हाला धर्मवीर 3 मध्ये रोल मिळेल. मला देखील एक सिनेमा काढायचा आहे. परंतु मी सिनेमा काढला तर अनेकांचे मुखवटे फाटतील. दुसरीकडे धर्मवीरच्या पुढील भागांची देखील तयारी सुरू करा, कारण एकनाथ शिंदे अजून 20 वर्षे काही थांबत नाहीत." देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यातून त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे जिव्हाळ्याचे संबंध देखील अधोरेखित झाले.
