मुंबई: राज्यात एकीकडे बिबट्याचे हल्ले वाढत असल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी लोकांचं जगणं कठीण केलं आहे. दर दिवसाला कुठे ना कुठे कुत्रे माणसांवर हल्ला करत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. अशातच मुंबईतील गोरेगाव भागात एका शाळेमध्ये भटक्या कुत्र्याने सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम सिद्धार्थनगर परिसरातील आदर्श विद्यालय शाळेच्या गेटवरही घटना घडली आहे. शाळेच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. हे कुत्रे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांवर थेट भुंकणे आणि हल्ला करत आहे. अशातच शाळेच्या गेटवर एका कुत्र्याने थेट झेप घेत सुरक्षारक्षकावर हल्ला केला.
शाळेच्या गेटवर सुरक्षारक्षक उभे होते. त्यावेळी दोन भटके कुत्रे हे गेटच्या आतमध्ये आले. एक कुत्रा हा आतमध्ये फिरला आणि सुरक्षारक्षकाच्या मागे मागे आला. सुरक्षारक्षक पुढे जाऊन वळला तसा कुत्र्याने झेप घेत खांद्याला चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षारक्षक कमालीचा घाबरला. त्याने लगेच झटका मारला आणि त्याला बाजूला केलं.
पण, या कुत्र्याने तोपर्यंत सुरक्षारक्षकाच्या खांद्याला चावा घेतला होता. हे पाहून तिथे उपस्थितीत असलेल्या दुसऱ्या सुरक्षारक्षकाने लाकडी काठी घेऊन धाव घेतली आणि चावा घेणाऱ्या भटक्या कुत्र्याला चांगलाच चोप दिला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या परिसरात कुत्र्यांची दहशत किती आहे हे या सीसीटीव्ही वरून दिसून येत आहेत. प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. शाळेचा परिसर आहे. आज सुरक्षारक्षकावर हल्ला केला आहे, उद्या लहान मुलांवर हल्ला करतील, त्यामुळे पालिकेनं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख दिनेश लोकरे यांनी केली.
