नवी मुंबईत : मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या अमित ठाकरे यांनी अचानक या पुतळ्याचे लोकार्पण केले. हा कार्यक्रम कोणतीही शासकीय परवानगी न घेता करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच जमावबंदी आदेश लागू असताना मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी जमले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
advertisement
70 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला
घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी तात्काळ चौकशी करत मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह सुमारे 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेणे आणि जमावबंदीचे उल्लंघन करणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलो होते की, अशा कार्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याचे स्वागतच करीन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केल्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच गुन्हा आहे.
तणावाचे वातावरण निर्माण
दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार राजकीय दबावामुळे झाल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी सर्व कारवाई कायदेशीर चौकटीत राहून केल्याचे सांगत, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. नेरूळमध्ये या घडामोडींमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
