मुंबई: मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येतात, मात्र गोरेगावच्या वनराई पोलिसांनी उघडकीस आणलेले हत्येचे प्रकरण धक्कादायक आणि तेवढेच विचित्र आहे. केवळ 'तळलेले मासे' खाल्ल्याच्या संशयावरून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणाचा तपास करताना कोणताही तांत्रिक पुरावा नसताना पोलिसांनी 200 कचरा वेचकांची चौकशी करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
advertisement
23 फेब्रुवारी रोजी मृत अफसर (35) हा त्याचे मित्र सुरेश आणि राजेश ऊर्फ नेपाळी यांच्यासोबत मासे घेऊन आला होता. तिघेही दारू पित मासे देखील बनवले. काही वेळाने अफसर नशेत झोपी गेला. दरम्यान, तव्यावर शिजवून ठेवलेले मासे उंदरांनी फस्त केले. मात्र, जेव्हा सुरेश आणि राजेश जेवणासाठी उठले, तेव्हा तव्यावर एकही मासा नसल्याचे पाहून त्यांचा संताप अनावर झाला. झोपलेल्या अफसरनेच सर्व मासे खाल्ले असावेत, असा संशय त्यांना आला.
दगडाने ठेचून केली हत्या
या किरकोळ कारणावरून दोघांनीही गाढ झोपेत असलेल्या अफसरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. संताप इतका अनावर झाला की, त्यांनी दगडाने त्याचे डोके ठेचून त्याला जागीच ठार केले. गुन्हा केल्यानंतर दोघेही तातडीने मुंबई सोडून हरियाणाला फरार झाले.
हरियाणातून मुसक्या आवळल्या
वनराई पोलिसांसमोर या तपासात मोठे आव्हान होते. मृत व्यक्ती आणि आरोपी या तिघांकडेही मोबाईल फोन, पत्ता किंवा कोणतेही ओळखपत्र नव्हते. या मर्डर'चा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 200 कचरा वेचकांची कसून चौकशी केली. त्यातून मृताची आणि संशयितांची ओळख पटली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि हरियाणातील कैथल येथून सुरेश व राजेशला अटक केली.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
अटकेत असलेला राजेश रमेशनाथ ऊर्फ नेपाळी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही दादर आणि इतर पोलीस ठाण्यांत खून व खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. किरकोळ संशय आणि नशेतून एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
