गौरी गर्जेनं आत्महत्या केली नाही, तर तिला तिघांनी गळा दाबून मारलंय, असा दावा गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केला आहे. अनंत गर्जे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर गौरीच्या आई वडिलांनी खळबळजनक दावे केले आहेत.
तिघांनी गळा दाबून गौरीला मारलं
advertisement
याप्रकरणी गौरीचे वडील अशोक पालवे म्हणाले की, गौरीच्या मृत्यू प्रकरणात फक्त एकटा अनंतच आरोपी नाही. त्याचे बहीण-भाऊ देखील यात आरोपी आहेत. त्या दोघांना अद्याप अटक केली नाही. लग्न होण्याआधीपासून अनंत वरळीत राहत होता. माझ्या मुलीला दोघा तिघांनी गळा दाबून मारलं आहे. आम्ही खरं बोलत आहोत. एकतर आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्हाला मारण्याची परवानगी द्या. फॉरेन्सिक टीम घरामध्ये गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्या घरांमध्ये उपस्थित होते. त्यामुळे गौरीच्या मृत्यूला आत्महत्येचं लेबल लावू नका.
गौरीला रोज मारहाण केली जात होती
या सगळ्यावर गौरीची आई अलकनंदा पालवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी अनंतला इतक्या लवकर न्यायालय कोठडी द्यायला नको होती. कारण गौरी आत्महत्या करूच शकत नाही, असं आमचं मत आहे. आरोपीला इतक्या लवकर त्याला न्यायालयीन कोठडी का देण्यात आली? यातील दोन आरोपी अजून पकडले गेले नाहीत. ते दोघे फरार आहेत. पोलिसांकडून सतत सांगितले जात आहे चौकशी होत आहे तपास करत आहोत. पण आज १२ दिवस झाले आहेत. तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. ते सर्व खोटं बोलत आहेत. तो गौरीला रोज मारत होता. अनंत गर्जेचे भाऊ आणि बहीण देखील एकत्र राहून तिला मारत होते. त्यामुळे त्या दोन आरोपींची देखील चौकशी व्हायला पाहिजे.
