मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतहा वाहतूककोंडीमुळे शालेय वेळेत शाळा पोहोचणे अवघड होते. त्यासाठी बेस्ट बसमधील मोफत प्रवासाची सुविधा शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, मेट्रोनेही शहरात प्रवास सोपा केला आहे तरी रोजच्या भाड्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत आहे.
मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना मेट्रोमध्येही मोफत प्रवासाची सुविधा देण्याची मागणी वाढत आहे. उद्धवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे याची शिफारस केली. त्यांच्या मते शालेय वेळेत मोफत प्रवासामुळे विद्यार्थी वेळेची बचत करू शकतील शिवाय सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करू शकतील.
advertisement
विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे केवळ त्यांच्या शिक्षणाला चालना देणार नाही तर पालकांच्या आर्थिक भारालाही काही प्रमाणात कमी करेल. तसेच मेट्रोचा वापर वाढल्याने रस्त्यावरील वाहतुकीतून देखील सुटका मिळेल. शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही योजना लवकर अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
