दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पावसाने नागरिकांच्या आनंदावर विर्जन टाकलं आहे. सकाळी ढगाळ वातावरण आणि मध्येच ऊन असं वातावरण असताना पावसाने अचानक संध्याकाळी हजेरी लावली. कल्याणसह बदलापूर, अंबरनाथ येथे पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात काळोखाचं वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे दिवाळी आहे. या दिवसांमध्ये घराघरात दिवे लावले जातात. घराबाहेर कंदील लावला जातो. पण ऐनवेळी आलेल्या पावसाने या सर्व उत्साहावर पाणी टाकलं आहे.
advertisement
दरम्यान, कल्याणसोबतच अंबरनाथ- बदलापुरातही आज संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंबरनाथ- बदलापूरनंतर कल्याणमध्ये पावसाने हजेरी लावली. बदलापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली.. सध्या दिवाळीमुळे सर्वच बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे. फुलांचे तोरण, कपडे, फटाके किंवा दिवाळीचे काही सामान खरेदी करण्यासाठी लोकं बाजारांमध्ये एकच गर्दी करीत आहेत.पण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपिट झाली . सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक व्यापार्यांचं पावसामुळे नुकसान झालं आहे.
मुंबईच्या दादरमध्येही पावसाने हजेरी लावली होती. ठाणे, मुंबईसह नवी मुंबईतही कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने अनेकांच्या आनंदावर विरझण पडलं आहे. अचानक पाऊस आल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये प्रचंड उकाडा वाढला होता. आज अचानक आलेल्या पावसामुळे काही वेळेसाठी का होईना वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण ऐन दिवाळीत पाऊस पडल्यामुळे नागरिकांचा मोठा हिरमोड झाला आहे.