कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणाची दुरूस्तीची कामे करण्यासाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. "अ" प्रभागक्षेत्रातील मांडा- टिटवाळा परिसरामध्ये मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून करण्यात येणाऱ्या पाणी वितरणाच्या व्यवस्थेतील जलवाहिन्यांची दुरूस्तीची कामे करण्याकरिता येत्या मंगळवारी दि.11- 11- 2025 रोजी सकाळी 09:00 ते रात्री 09:00 वाजेपर्यंत 12 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे.
advertisement
महानगर पालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील काही भाग, तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गाव या परिसरातील होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सोमवारी म्हणजेच 10- 11- 2025 रोजीच सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती. महानगर पालिका प्रशासनाने केली आहे. येत्या मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) हँडलवरून देण्यात आली आहे.
या बारा तासाच्या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक ते दोन दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. शिवाय, पाणी पुरवठा बंद राहणार आहे, त्या दिवशी जरा जपून पाणी वापरण्याचे आवाहनही महानगर पालिकेने केले आहे. गेल्या महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे महानगर पालिकेला पाणी पुरवठा बंद करण्याची गरज लागली नव्हती. आता अनेक पाईपलाईन्स सह इतरत्र सर्वच कामे पालिका प्रशासनाकडून केले जाणार आहे. टिटवाळ्याच्या मोहिली पाणी पुरवठा केंद्रातून अनेक महानगर पालिका क्षेत्रातील परिसराला पाणी पुरवठा केले जातो. अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची पंचायत होण्याची शक्यता आहे.
